फुलगांव रेल्वे गेटवर वाहन धडकले ; वाहतूक झाली ठप्प

0

वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल होणार ; पोलिसांकडून धडक कारवाईची अपेक्षा

भुसावळ- महामार्गावरील भुसावळ ते वरणगाव रस्त्यावरील फुलगाव रेल्वे गेट बंद होत असतांना भरधाव वेगातील चारचाकीने धडक दिल्याने रेल्वे गेट तुटल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातानंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला तर सुमारे दोन तासापर्यंत वाहतूक ठप्प झाली. या प्रकरणी धडक देणार्‍या चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रेल्वे प्रकल्पात रॅक जाताना चारचाकी गेटवर धडकली
दीपनगर औष्णिक विज निर्मिती प्रकल्पात कोळसा वाहून नेण्यासाठी वरणगाव ते प्रकल्पापर्यंत रेल्वे मार्ग अंथरण्यात आला आहे. या मार्गावर फुलगावजवळ भुसावळ-वरणगाव महामार्गावर रेल्वे गेट उभारण्यात आले आहे. कोळसा वाहतुकीचा रॅक प्रकल्पात जात असताना रेल्वे गेट काही वेळेसाठी बंद केले जाते तर त्यासाठी स्वतंत्र गेटमन नियुक्त करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 9.30 वाजता कोळसा वाहून नेणारी रेल्वे रॅक प्रकल्पात जात असताना गेटमन रेल्वे गेट बंद करीत असतानाच भुसावळकडून वरणगावकडे भरधाव वेगात जाणारी चारचाकी (एम.एच.12 आर.आर.0146) ने वरणगावकडील गेटला जबर धडक दिल्याने गेट मार्गाच्या मध्यभागी वाकले तर अर्धे गेट तुटले. धडकेनंतर वाहनधारक घटनास्थळावरून पसार झाला तर गेटमन दीपक सोनवणे यांनी तुटलेले गेट बाजूला करून वरीष्ठांना माहिती दिली मात्र एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.

वाहतूक कोंडीत अडकले वर्‍हाडी
शनिवारी लग्नसराईचा मोठा दिवस असल्याने अनेक वाहन धारकांसह वर्‍हाडी खोळंबून असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. वाहतुकीची कोंडी सुमारे दोन तास सुरू होती. त्यानंतर रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांच्या सुचनेनुसार गेट बाजूला करण्यात आल्याने वाहतूकसुरळीत झाली यानंतर रेल्वे गेटचे नुकसान करणार्‍या वाहनधारकांविरूद्ब गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

धडक कारवाईची मागणी
एरव्ही नेहमी वाहनधारकांवर कारवाईसाठी वरणगाव व जळगाव येथील वाहतूक शाखेचे पोलीस फुलगाव रेल्वे गेटजवळ थांबून वाहनधारकांवर कारवाई करतांना दिसून येतात. शनिवारी मात्र वाहतुकीची कोंडी होत असताना वाहतूक शाखेचा एकही पोलीस या ठिकाणी दिसून आला नाही. यामूळे वाहनधारकांमध्ये संताप व आश्‍चर्य व्यक्त होत होते. या भागात धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.