फुलगाव येथे प्रवेशद्वाराचा 20 रोजी उद्घाटन व नामकरण सोहळा

0

भुसावळ । तालुक्यातील फुलगाव येथे उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन व नामकरण सोहळा सोमवार 20 रोजी सकाळी 8.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद शेष फंड आणि लोकसहभागातून फुलगाव येथे राष्ट्रीय महामार्गालगत भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराला महाराष्ट्रभूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे. तसेच प्रवेशद्वार परिसर सुशोभीकरण देखील करण्यात येत आहे. प्रवेशद्वार उद्घाटन व परिसर सुशोभीकरण जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आस्तिककुमार पांडेय या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

ग्रामस्थांनी केली जय्यत तयारी
उद्घाटन सोहळ्यासाठी पाच एकर जागा स्वच्छ करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी फुलगाव ग्रामस्थांसह तालुकाभरातील हजारो महिला व पुरूष सदस्य उपस्थित राहणार आहे. यानिमित्त ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे.
धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वांगिण विकासाचे कार्य राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छता व आरोग्याचा संदेश, लोकसहभागातून निःस्वार्थ वृत्तीने काम, संतांची शिकवणूक, बालबैठका व बालउपासनेतून लहान मुलांवर संस्कार करणे तसेच अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रीयांवरील अत्याचार, जातीभेद अशा कुप्रवृत्तीवर प्रहार करणे, समाजात सद्गुणांची पेरणी करणे, तणावमुक्त जीवन जगण्याचा संदेश देणे, समाजाला सन्मार्गाला लावणे तसेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा सर्वांगिण पुरूषार्थाची बैठकांद्वारे समाजाला ओळख करून देण्याचे काम डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान करत आहे. अशा समाजोपयोगी प्रतिष्ठानचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव फुलगाव येथील प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. परिसरातील सर्वांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फुलगाव ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांसह ग्रामस्थांनी केले आहे.