सिंगापूर । 35 हजार डॉलर्स बक्षीस रकमेच्या सिंगापूर सुपरसिरीज स्पर्धेमधून आपण माघार घेत असल्याची घोषणा लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेत्या सायना नेहवालने केली आहे. आगामी हंगामात भरगच्च आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत असून त्या पार्श्वभूमीवर आणखी सुसज्ज राहता यावे, तयारीवर-सरावावर अधिक भर देता यावा, यासाठी आपण सिंगापूरमध्ये सहभागी होणार नाही, असे 27 वर्षीय सायनाने स्पष्ट केले. दरम्यान, सिंगापूर सुपरसिरीज स्पर्धेत आता रिओ ऑलिम्पिक रौप्यजेत्या पीव्ही सिंधूवर भारताची महत्त्वपूर्ण भिस्त असेल.
सायना सिंगापूरमध्ये खेळणार नाही. मात्र, या महिनाअखेरीस वुहान-चीन येथे होणा-या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत तिने आपण निश्चितपणाने सहभागी होणार असल्याचे नमूद केले आहे. यानंतर मी आशियाई चॅम्पियनशिप खेळेन. शिवाय, त्यानंतर इंडोनेशिया सुपरसिरीज व सुदिरमन चषक स्पर्धेतही सहभागी होईन, असे 2010 राष्ट्रकुल स्पर्धेत चॅम्पियनशिप जिंकणा-या सायनाने यावेळी स्पष्ट केले. यापूर्वी, तिने जानेवारीत मलेशिया मास्टर्स ग्रँडप्रिक्स स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. मागील आठवडयात संपन्न झालेल्या मलेशिया ओपन स्पर्धेत मात्र पहिल्याच फेरीत तिचे आव्हान संपुष्टात आले होते. त्या पार्श्वभूमीवर तिने सरावावर आणखी भर देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, सिंगापूर सुपरसिरीजमध्ये आशास्थान असलेल्या पीव्ही सिंधूला कठीण ड्रॉ मिळाला आहे.