फुले दांपत्यास भारतरत्न देण्यासाठी कटिबद्ध

0

राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : ज्यांच्या आदर्शाने महाराष्ट्रात समाज क्रांती घडली व नवसमाज समाज उभा राहिला त्यातून बलशाली राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणाचा पाया रोवला, महिला शिक्षणाचे व सक्षमीकरणाचे दार ज्यांच्यामुळे आज खुले झाले आहे, असे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनास तसा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने पुण्यात सामाजीक न्याय विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने बडोले गुरुवारी पुण्यात आले होते.

समाजोपयोगी उपक्रमांची अंमलबजावणी

राजकुमार बडोले यांनी सपत्नीक फुले वाड्यात भेट दिली. यावेळी त्यांनी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फुले वाड्यात एका सामाजिक संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाज समाजोपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जात आहेत. समाजसुधारकांनी जो आदर्श घालून दिला आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून राज्य प्रगती करीत आहेत. त्यातून नवनवीन योजना राबविल्या जात असल्याचेही बडोले यांनी यावेळी बोलताना सांगितले. राजकुमार बडोले यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी शारदा बडोले देखील उपस्थित होत्या त्याच प्रमाणे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे विजयकुमार गायकवाड, यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

प्रशासनातर्फे अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, हेमंत निकम, संजय आसवले, तहसिलदार हेमंत निकम, हनुमंत पाटील, विकास भालेराव यांनीही अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.