फुले मार्केटमधील पाच गाळे सील !

0

मनपा प्रशासनाच्या कारवाई , उपायुक्तांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न,काही वेळ तणाव,दुपारपर्यंत मार्केट बंद

जळगाव : मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.तसेच दोन दिवस पून्हा संधी देण्यात आली होती. मुदतीत न भरल्यास प्रशासनाने कारवाईचा इशारा देखील दिला होता.दरम्यान,मनपा उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांच्यासह पथक फुले मार्केटमध्ये कारवाईसाठी गेले होते.एका व्यापार्‍याचे तीन गाळे सील केल्यानंतर दुसर्‍या व्यापार्‍याचे गाळे सीलची कारवाई करताना काही व्यापार्‍यांनी उपायुक्तांना घेराव घालून त्यांना कोंडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उपायुक्त गुट्टे आणि व्यापार्‍यांमध्ये वाद चिघडला आणि हा वाद शहर पोलीस ठाण्यात गेला.याठिकाणी उपायुक्तांनी व्यापार्‍यांविरुध्द तक्रार दाखल केली.मनपा प्रशासनाने फुले मार्केटमधील दोन व्यापार्‍यांचे पाच गाळे सील केले.या कारवाईविरोधात गाळेधारकांनी घोषणाबाजी करत मार्केट बंद केले.

गाळे सील करण्याची कारवाई
महापालिकेच्या मुदत संपलेल्या फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील 976 गाळेधारकांना कलम 81 ’क’ नुसार नोटीस बजावून 11 ऑक्टोंबरपर्यंत थकीत रक्कम भरण्याची मुदत दिली होती. शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने दोन दिवसाची मुदत वाढ देवून देखील अनेक गाळेधारकांनी थकबाकी भरली नाही. अशा गाळेधारकांवर सोमवारी उपायुक्त गुट्टे यांच्यासह अतिक्रमण व किरकोळ वसुली विभागाच्या पथकासह फुले मार्केटमधे गाळे सीलची कारवाईसाठी गेले होते. यावेळी फत्तेचंद जसुमल ललवाणी यांचे 115,116,117 क्रमांकाचे गाळे सील करण्यात आले. त्यानंतर आनंद रोषणलाल नाथाणी आणि महेंद्र नाथाणी यांचे गाळे सील करतांना काही व्यापार्‍यांनी उपायुक्तांना घेराव घालून कोंडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,उपायुक्त आणि गाळेधारकांमध्ये वाद झाला.

शहर पोलीस ठाण्यात गर्दी
मनपा उपायुक्त आणि गाळेधारक यांच्यात वाद चिघडल्यानंतर परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यासाठी मनपा उपायुक्त उत्कर्ष गुट्टे,अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान,किरकोळ वसुली विभाग प्रमुख नरेंद्र चौधरी आणि पथकातील कर्मचारी तर दुसरीकडे गाळेधारक देखील शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले.त्यामुळे याठिकाणी गर्दी झाली होती.दरम्यान,दुपारी गाळेधारक कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनाही भेट देवून अधिकारी व गाळेधारकांशी चर्चा केली.

राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील यांना गाळेधारकांचा पुळका
मनपा प्रशासनाच्या कारवाईला विरोध करण्यासाठी गाळेधारकांनी फुले मार्केट बंद केले. यावेळी गाळेधारकांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.त्यामुळे गोंधळ उडाला होता. आचारसंहिता असल्यामुळे कुर्तास कारवाई करु नये अशी मागणी करण्यासाठी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचया निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी आयुक्तांना निवेदन दिले.तसेच शहर पोलीस ठाण्यात येवून त्यांना गाळेधारकांशी चर्चा देखील केली.

गाळेधारकांमध्ये खळबळ
मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी मुदत दिली होती.केवळ 50 गाळेधारकांनी थकीत रक्कम भरली.मात्र उर्वरीत गाळेधारकांनी थकीत रक्कमेचा भरणा न केल्यामुळे मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली. कारवाईला विरोध करण्यासाठी फुले मार्केट दुपारपर्यंत बंद करण्यात आले होते.