फुले मार्केटमध्ये गाळा मिळवून देण्याच्या आमिषाने जळगावातील महिलेला 18 लाखांचा गंडा

0

जम्मू-काश्मिरमधील संशयित तरुण शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात 

महिलेने रोख 2 लाख तर उर्वरीत पैसे ऑनलाईन खात्यात केले वर्ग

इगतपुरी येथून सापळा रचून केली अटक

जळगाव- शहरात दुसर्‍या राज्यातून वास्तव्यास आलेल्या एका तरुणाने ओळखीचा फायदा घेत फुले मार्केटमध्ये गाळा मिळवून देण्याचे आमिष दाखवित ज्ञानदेव नगरातील महिलेचा 18 लाखांत गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी संशयित जाहीद निसार ईट्टू (वय24, रा. डांगरपुरा, अहिबोहल, अनंतनाग, जम्मू काश्मिर) या तरुणाला इगतपुरी येथून सापळा रचून अटक केली आहे. दरम्यान तरुणाने 10 लाख रुपये घेतल्याचा दावा पोलिसांकडे केला आहे.

शहरातील ज्ञानदेव नगरातील महिलेच्या फसवणुकीप्रकरणी शनिपेठ पोलिसात 3 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

शिक्षणाचा दबाव टाकल्याने तरुण घरुन पळाला
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जाहीद निसार ईट्टू या तरुणाला त्याच्या कुटुंबियांनी शिक्षण पूर्ण करण्याचा दबाव टाकल्याने तो जम्मू येथील घरातून पळून आला आहे. यादरम्यान त्याने काही दिवस इगतपुरी येथे सायकलची स्टंटबाजी करणार्‍या एका जणाची मैत्री केली तसेच त्याच्या घरी काही दिवस वास्तव्य केल्यानंतर तो रेल्वेने जळगावात आला.

ओळखीचा फायदा घेत महिलेला गंडविले
जळगावात आल्यानंतर जाहीदची पिंप्राळा येथील एका महिलेची ओळखी झाली. तिच्याकडे त्याने काही दिवस वास्तव्य केले. याच महिलेच्या माध्यमातून त्याची कालिंकामाता परिरातील ज्ञानदेव नगरातील महिलेची ओळखी झाली. या महिलेकडेही त्याने काही दिवस वास्तव्य केले. तिच्याशी जवळीक साधत विश्‍वास निर्माण केला. महिलेला दुकानकामी गाळ्याची आवश्यकता आहे, ही बाब जाहीदने ओळखली. व तिला फुले मार्केटमध्ये गाळा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. व त्यापोटी 18 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.

इगतपुरीच्या मित्राच्या पत्नीवर खात्यावर मागविले पैसे
जाहीदवर विश्‍वास ठेवत महिलेने त्याला सुरुवातीला रोख दोन लाख रुपयाची रक्कम दिली. यानंतर जाहीदने महिलेला त्याच्या इगतपुरी येथील सायकल स्टंन्ट करणार्‍या मित्राच्या पत्नीच्या खाते क्रमांक दिला. व त्यावर उर्वरीत रक्कम टाकण्याचे सांगितले. त्यानुसार महिलेने पैसे वर्ग केले. मात्र यानंतर संबंधित तरुणाशी संपर्क न झाल्याने व आपली फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने 3 नोव्हेंबर 2018 रोजी शनिपेठ पोलिसात तरुणाविरोधात तक्रार दिली होती.

खातेक्रमांकावरुन लागला तरुणाचा छडा
शनिपेठ पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांनी पोलीस उपनिरिक्षक श्रीधर गुठ्ठे, पोलीस हवालदार सलीम पिंजारी व अभिजित सैंदाणे याचे पथक तयार करुन त्यांना तपासाच्या सुचना दिल्या. पथकाने ज्या खातेक्रमांकावर पैसे वर्ग झाले होते, तो मिळवित त्यानुसार इगतपुरी गाठले. याठिकाणी सायकल स्टंन्टकरणार्‍या इसमाकडे जाहीद राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी इगतपुरी पोलीस व स्टंटमॅनच्या मदतीने सापळा रचला. स्टंटमॅनकडे कपडे घेण्यासाठी आलेल्या जाहीदला बुधवारी रात्री इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. व शनिपेठ पोलिसांनी संपर्क साधला. शनिपेठ पोलीस जाहीदला घेवून गुरुवारी पहाटे 2.30 वाजता जळगावात दाखल झाले.

संशयिताला दोन दिवसांची कोठडी
जाहीदने महिलेला फसविल्याची कबुली दिली आहे. मात्र त्याने मी 2 लाख रोख व 9 लाख खात्यावर वर्ग असे एकूण 11 लाख घेतल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे महिलेने 18 लाख रुपये देण्यावर ठाम आहे. दरम्यान जिहादला जिल्हा न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी शनिपेठ पोलीस जाहीदशी पिंप्राळ्यातील ज्या महिलेशी ओळखी होती, त्याठिकाणी घेवून गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.