शहर पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा
जळगाव- शहरातील फुले मार्केटमधील थकबाकी असलेल्या गाळेधारकांवर कारवाई करण्यास केलेल्या महापालिकेच्या उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांना व्यापार्यांनी एका दुकानात कोंडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी 11 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थकबाकी न भरणार्या गाळेधारकांवर कारवाईसाठी सोमवारी वसुली विभागाचे नरेंद्र चोधरी, अतिक्रमण विभागाचे हाफीज उल्लाखान मौजदार खान, सतीष ठाकरे, संजय पवार, संजय पाटील, तय्यब पटेल, वैभव धर्माधिकारी, आशिष सुरळकर या कर्मचार्यांचे पथक केले होते. फुले मार्केटमधील गाळा नं 115, 116, 117 हे गाळे सील केल्यानंतर यानंतर पथक आनंद रोशनलाल नाथाणी व महेंद्र नाथानी यांचा गाळा क्रमांक 5 ताब्यात घेण्यासाठी गेले असता, नाथानी यांनी उपायुक्तांसह पथकाला उद्देशून गाळा सील करु देणार नाही व दुकानाची लाईट बंद करुन दुकानात कोेंडण्याचा प्रयत्न केला. यानंतर घेराव घालून धक्काबुक्की व अश्लिल शिवीगाळ केली.
पोलीस ठाण्यात जातांना रस्ता अडवून शिवीगाळ
उपायुक्त गुठ्ठे यांच्यासह पथक तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात येत नाथाणी यांच्यासह आठ ते दहा व्यापार्यांनी त्याचा पाठलाग केला. तसेच रस्ता अडवून शिवीगाळ केली, नाथानी यांनी उपायुक्तांना उद्देशून तुमच्या विरोधात सर्व व्यापारी खोटे गुन्हे दाखल करुन , तुम्हाला नोकरी करणे कठीण होवून जाईल, अशी धमकी दिली. याप्रकरणी उपायुक्त गुठ्ठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आनंद रोशनाला नाथानी, महेंद्र रोशनलाल नाथाणी, देवेंद्र फुलचंद चोपडा, शितलदास हरिओम जवाहराणी, जितू परवाणी, नंदलाल गेलाराम लुल्ला, विशनदास लोचाराम कावना व इतर 3 ते 4 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश बुवा करीत आहेत.