जळगाव । शहरात महापालिकेतर्फे ‘नो हॉकर्स झोन‘ मध्ये अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविण्यात येत असून यानुसार आज फुले मार्केटमध्ये कारवाई करतांना हॉकर्स व कर्मचार्यांमध्ये हाणामारी झाली. या धावपळीत एक विक्रेता पडल्याने जखमी झाला. तसेच मनपा कर्मचार्याला मारहाण करणार्या विक्रेताला पकडून शहर पोलिसांच्या स्वाधिन केले. या घटनेबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल
आज फुले मार्केटमध्ये दुपारी एकच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक फुले मार्केटमध्ये कारवाईसाठी गेले असता गेटनंबर दोन जवळील फुटपाथवरील विक्रेत्यांवर कारवाईला सुरवात केली. यावेळी कर्मचारी सामान जप्त करत असतांना विक्रेता व कर्मचार्यांमधे झाटापट झाली. यात मनपा कर्मचारी शांताराम सपकाळे यांना एका विक्रेत्याने लाथा-बुक्यांनी मारहाण करायला सुरवात केली. महापालिका कर्मचार्यास विक्रेता मारत असल्याने सर्व कर्मचार्यांनी धावत जावून मारहाण करणार्या विक्रेत्याला पकडले. दरम्यान, या घटनेत चंद्रकांत दत्तू महाजन याचे डोके फुटून जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तर एका विक्रेत्याला पकडून मनपा कर्मचार्यांनी शहर पोलिस ठाण्यात नेऊन जमा केले. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल विक्रेत्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
कर्मचार्यांनी जखमी केल्याचा आरोप
महापालिका कर्मचार्यांनी शहर पोलिस ठाण्यात मारहाण करणार्या विक्रेत्याला पकडून जमा केले. याघटनेनंतर विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यात गर्दी करून प्रकरण बाहेर मिटवीण्याचा प्रयत्नात होते. तसेच अतिक्रमण निर्मूलन विभाग अधिक्षक एच. एम. खान यांनी पोलिस ठाण्यात येवून तक्रार नोंदविली. अतिक्रमण निर्मूलन कारवाईप्रसंगी झालेल्या झटपाटीत विक्रेता चंद्रकांत महाजन याचे डोके फुटून जखमी झाला असता त्यास त्वरीत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मनपा कर्मचार्यांना मारहाण करून जखमी केल्याचा आरोप चंद्रकांतने केला आहे. तर कारवाई करतांना झालेल्या धावपळीत विक्रेता पडल्याने जखमी झाला असल्याचे मनपा अधिकार्यांचे म्हणणे आहे.