जळगाव । उपविभागीय दंडाधिकारी जलज शर्मा यांनी शनिवारी फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट व परिसरात स्वच्छतेची पहाणी केली होती. या परिसरात सांडपाण्याची विल्हेवाट, निचरा वेळीच होत नसल्याचे श्री. शर्मा यांना आढळून आल्याने त्यांनी सोमवार 24 जुलैंपर्यंत साफ-सफाई करण्याची नोटीस काढली आहे. या नोटीसीनुसार फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील हॉकर्संबांधवांनी रविवारी सकाळी 6 वाजेंपासूनच स्वच्छतेची सुरूवात केली. यात त्यांनी 6 टॅक्टर एवढा कचरा जमा केला. हॉकर्स बांधवांनी सकाळी एकत्र येत मार्केटचे मुख्य प्रवेश द्वार, पॅसेज, तळमजल्याची सफाई केली. सफाईकार्य संथ गतीने सुरू आहे.
दुकानमालक स्वच्छतेविषयी बेफिकीर
सफाईच्या आदेशानंतर काही दुकानात कामकरणार्या तरूणांनी शुक्रवारी रात्रीच साफसफाई केली. यात साजन सजनी दुकानातील कामगार तरूणांनी दुकानासमोरील कचरा साफ केला. तसेच गटार देखील काढली. सफाईसाठी लागणारे साहित्य विकत घेण्यासाठी साजन सजनीचे मालक प्रदीप जैन यांनी इतर दुकानदारांकडे वर्गणी मागितली असता त्या दुकानदारांनी सहकार्य केले नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. तसेच जे दुकानदार कचरा बाहेर टाकतात त्यांच्याकडून दंड आकारण्यात यावी अशी मागणी केली.
जमा कचर्यांचे ढीग मात्र जैसे थे
दरम्यान संध्याकाळपर्यंत दुकानदारांनी जमा केलेल्या कचर्यांचे ढीग आहे त्या स्थितीत पडून होते. हॉकर्सबांधवांनी सकाळी 6 ते 11 या वेळेत कचरा गोळा करुन मार्केट स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना दुकानदारांची साथ लाभली नाही. दुकानदारांनी जमा केलेला कचरा उचलून नेण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला आढळून आला नाही. डकमध्ये जमा झालेला कचरा उचलण्यात आलेला नाही. यातून उपविभागीय दंडाधिकार्यांच्या नोटीसाला व्यापार्यांनी गांभीर्याने घेतले नसल्याने दिसते.
मजूर मिळत नसल्याची व्यथा
उपविभागीय दंडाधिकार्यांच्या नोटीसप्राप्त होताच प्रत्येक विंगमधील दुकानदारांनी स्वच्छता करण्याचे काम रविवारी सकाळपासूनच सुरू केले होते. यात त्यांनी जिन्याला लावलेले फट काढणे, दुकानासमोरील कचरा जमा करणे यासारखे स्वच्छतेचे कामे हाती घेतली होती. तर तळमजल्यावर दुकानदारांनी वरच्या मजल्यावरील दुकानदार कचरा खाली फेकत असल्याने कचर्यात वाढ होत असल्याची तक्रार केली. मार्केटच्या प्रत्येक विंगच्या कोपर्याला दुकानदार कचरा गोळा करतांना आढळून आले. कचरा उचलण्यासाठी टॅक्टर बोलविण्यात आली असल्याची माहिती चेतनदास कारडा, गुरूमुखदास तलरेजा, अतीक चोरडीया आदी व्यापार्यांनी दिली. रविवार असल्याने कचरा उचलण्यासाठी, सफाई करण्यासाठी मजूर तसेच टॅक्टर मिळत नसल्याची माहिती तलरेजा यांनी दिली. तर मार्केटमधील दुकानदारांनी महानगरपालिकेने प्रत्येक विंगमध्ये डस्ट बीन ठेवण्याची मागणी केली.