पुणे । महात्मा फुले केवळ नेते नव्हते तर विज्ञानाच्या कसोटीवर भारतीय ज्ञान तोलून आपण ज्या समाजाचे नेतृत्व करतो त्या समाजबांधवांचा जीवनस्तर कसा उंचावेल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करणारे द्रष्टे नेते होते, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. महात्मा फुले यांच्या 127 व्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे मंगळवारी समता दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. गो. माळी यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते त्यांना गौरवविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. एक लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार पंकज भुजबळ, मोतीलाल सांकला, अॅड. जयदेव गायकवाड, कमलताई-ढोले पाटील, उल्हास ढोले पाटील, कृष्णकांत कुदळे, अरविंद जमदाडे, प्रितेश गवळी, मंजिरी धाडगे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया
महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाबरोबरच प्राथमिक शिक्षणालाही तितकेच महत्त्व दिले होते. प्राथमिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा पाया असतो, तोच पाया मजबूत करण्याचे काम मी केले आहे. फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा माझ्या आयुष्यावर प्रभाव असून ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेली साखरशाळा हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल होते, असे पुरस्करार्थी डॉ. मा. गो. माळी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी केले. तर प्रितेश गवळी यांनी आभार मानले.
आधुनिकतेची आस
महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा विचार हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून तो संसदेच्या प्रांगणापासून ते भारताच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचलेला आहे. प्रखर विरोध आणि संघर्ष पत्करूनही त्यांनी त्यांचे विचार सोडला नाही. सर्वसामान्यांच्या प्रगतीचा ध्यास त्यांनी सतत उराशी बाळगला होता. भारतात पारंपारिक पद्धतीने पिकवला जाणारा जोंधळा व दुग्ध व्यवसाय यास पाश्चात्य संकरीत पर्याय उपलब्ध करून देण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. महात्मा फुले यांना सतत आधुनिकतेची आस होती आणि प्रत्येक क्षेत्रातील जागतिक स्तरावरचे ज्ञान प्राप्त करून देशाचा विकास साधण्यावर त्यांचा भर होता, असे पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सामाजिक न्यायात भेदभाव
आजही सामाजिक न्यायाच्या बाबतीत भेदभाव दिसून येतो. तसेच सामाजिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार्यांना संकटांना सामोरे जावे लागते. आजही न्याय व्यवस्थेत अल्पसंख्यांक समुदायांना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. महात्मा फुलेंना अपेक्षित असलेल्या सामाजिक न्यायापासून आजही आपण कोसो दूर आहोत. अल्पसंख्यांकांच्या सर्वांगीण विकासासाठी संविधानात करण्यात आलेल्या तरतुदींमध्येही आज पळवाट शोधली जाते. न्याय पालिकेत देखील घराणेशाह दिसून येते. माध्यमांमध्ये देखील अल्पसंख्यांकांना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नसल्याने महात्मा फुलेंचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यात अडथळे निर्माण होत आहेत, असे उपेंद्र कुशवाहा यांनी सांगितले.