फूड फेस्टिव्हलसाठी 85 झाडांची पालिकेकडून कत्तल

0

माजी महापौर मंगला कदम यांचा आरोप

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेने खुल्या मैदानातील तब्बल 85 झाडांची कत्तल केली आहे. भाजप नगरसेवकाच्या वाढदिवसासाठी मैदान सपाटीकरणास अडथळा ठरणार्‍या 85 झाडांवर कुर्‍हाड चालविली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार करुनही त्याकडे जाणीवपुर्वक कानाडोळा केल्याचा आरोप माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक नाना काटे, मयुर कलाटे, शाम लांडे, प्रशांत शितोळे आदी उपस्थितीत होते.

तीन दिवसांच्या कार्यक्रम…

कदम म्हणाल्या, संभाजीनगर येथील बस टर्मिनलचे आरक्षण महापालिकेने कोट्यवधी रुपये भरुन ताब्यात घेतले आहे. बस टर्मिनल विकसित होईपर्यंत महापालिकेने वृक्षारोपण करुन झाडे वाढविली होती. परंतु, भाजपचे स्थानिक नगरसेवक तुषार हिंगे यांनी फरगडे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शिवशाहू उद्यानासमोरील मोकळी जागा आरक्षण क्रमांक 123 ही जागा खाद्य महोत्सवासासाठी तीन दिवसांसाठी जागा भाड्याने देण्याबाबत 7 जानेवारी रोजी प्रशासनाला पत्र पाठविले होते. त्याचदिवशी आपण आयुक्तांना पत्र देऊन तक्रार केली होती. झाडे व सीमाभिंत तोडून हे काम चालू आहे. तथापि, आयुक्तांनी चौकशी करुन दोषींवर कारवाई करु असे सांगितले. मात्र, त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही.

तीन हजार रुपयांसाठी झाडांवर कुर्‍हाड…

याठिकाणी फूड फेस्टिव्हलसाठी परवानगी देण्यात आली. परिणामी, भूखंडावरील पुर्ण वाढ झालेल्या तब्बल 85 झाडांची कत्तल झाली. त्यामध्ये आंबा 6, पिंपळ 3, बाबुळ 4, जांभुळ 5, कडूलिंब 1, उंबर 1 आणि सुबाबळ 55 अशा तब्बल 85 झाडांवर कुर्‍हाड चालविली आहे. भुखंडाच्या मोबदल्यात महापालिकेला केवळ तीन दिवसासाठी तीन हजार रुपये भाडे मिळाले आहे. महापालिका पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकीकडे दरवर्षी झाडे लावणे, जगवणे यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते आणि दुसरीकडे तीन हजार रुपयांसाठी त्या झाडांची पुर्ण वाढ झाल्यावर भाजप नगरसेवकाच्या दबावाखाली कत्तल केल्याचा आरोप कदम यांनी केला.