जळगाव । शिरसोली रस्त्यावरील शामा फायर वकर्स या फटाक्याच्या कंपनीत आज दुपारी दारूमिश्रण करण्याच्या ठिकाणी स्फोट होऊन दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. स्फोट इतका जोरदार होता की ती खोली उद्ध्वस्त झाली. या स्फोटामुळे बाहेर काम करणारी मजुर महिला जखमी झाली असून तिला आधी जिल्हा रूग्णालयात व नंतर खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
स्फोटकांची दारु तयार करण्याची खोली उद्ध्वस्त
शामा फटाका फॅक्टरीत दुपारी जेवण झाल्यानंतर राजू बाबूराव तायडे व हेमंत प्रेमलाल जैस्वाल हे काम करण्यासाठी गेले होते. दारूचा मसाला तयार करण्याच्या खोलीत काय घडले ते कोणाच्या लक्षात येण्याआधीच स्फोट झाला.स्फोट इतका भयानक होता की पूर्ण खोली उद्ध्वस्त झाली राजु तायडे व हेमंत जैस्वाल याचे शरीरावरील कोणतेच कपडे शिल्लक राहिले नाही. स्फोटात दोघे जागीच ठार झाले. आवाज ऐकून दुसरीकडे काम करत असलेल्या गीता मोची यांनी पळ काढला परंतु पळतांना त्यांच्या डोक्याला स्फोटात उडालेली विट लागली. जिल्हा रुग्णालयात त्यांच्या डोक्याला पाच टाके घालण्यात आले असून सायंकाळी खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. या खोलीत दारूचा मसाला तयार करून तो फटाके बनविण्यासाठी लहान पाकिटात पाकिंग करून पाठविण्यात यत होता. दिवसाला 4 किलो दारूचे मिश्रण करण्यात येत असल्याचे संबंधितांनी सांगितले. मयत राजु तायडे यांचे वडील बाबुराव तायडे हे 17 वर्षांपासून येथे रोजंदारीने काम करत आहे. मुलगा राजु देखील या कारखान्यात काम करत होता. राजु विवाहित असून पायल (वय 6) व पल्लवी (वय 3) या दोन मुलींसह पत्नी अनिता, आई-वडील व लहान भाऊ सागर असा त्याचा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात त्याचे परिवाराने त्याला एकदातरी पाहु द्या असा टाहो फोडला होता. पत्नी अनिताची मनस्थिती सैरभैर झाली होती. तायडे यांचे मुळगाव नांदुरा असून त्यांचे येथे घरदार काहीही नाही. परिसरातील खोल्यांमध्ये ते वास्तव्यास आहेत.