फॅसिलिटी सर्व्हिसेस अभ्यासक्रम राबविणार

0

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व बीव्हीजी इंडियाचा सहभाग

हडपसर । विद्यार्थ्यांची आवड विकसित करण्याबरोबर कौशल्यावर आधारित कोर्सेस असण्याची गरज आहे. हाउसकीपिंग,प्लंबिंग, फिटर, माळीकाम याचा बी.एस्सी इन फॅसिलिटी सर्व्हिसेसमध्ये समाविष्ट असून स्किल इंडियाच्या माध्यमातून हा कोर्स सुरू झाला आहे. तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोकरीची हमी दिली जाईल, असे आश्‍वासन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उत्तमराव जाधव यांनी दिले.

रयत शिक्षण संस्थेच्या एस.एम. जोशी कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्था सातारा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्या वतीने बी.एस्सी इन फॅसिलिटी सर्व्हिसेस पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, डॉ. अशोक पांढरबळे, डॉ. अशोक धामणे, डॉ. सुनंदा पिसाळ, डॉ. कैलास रोडगे, डॉ शरद पासले, प्रा. बाळासाहेब गायकवाड, प्रा. माळी आदी उपस्थित होते.

डॉ. बुरुंगले म्हणाले, उपेक्षितांच्या साठीचे शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद होते म्हणून जे कोणी शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सुरू झाले. अनेक शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. अशा मुक्त विद्यापीठाचे केंद्र एस.एम. जोशी कॉलेजमध्ये कार्यरत आहे. प्रास्ताविक डॉ. एम. एल. डोंगरे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. सुनंदा पिसाळ यांनी केले. तर आभार डॉ. पांढरबळे यांनी मानले.