फेकरी ग्रामस्थांचा रस्ता बंद

0

भुसावळ। तालुक्यातील फेकरी येथील नविन रेल्वे बोगद्याखाली पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून यातील पाणी बाहेर काढण्याची यंत्रणाच रेल्वे प्रशासनातर्फे कार्यान्वित करण्यात आलेली नसल्यामुळे येथून ग्रामस्थांना ये-जा करण्याचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दीपनगर येथून निंभोरा उड्डाणपुलावरुन दीड किलोमीटर फिरुन जावे लागत आहे. याचा त्रास शालेय विद्यार्थ्यांसह आपत्कालीन कामासाठी भुसावळला ये-जा करणार्‍या नागरिकांना सहन करावा लागत आहे.

फेकरी येथून भुसावळ शहराला जोडणार्‍या महामार्गावरील रेल्वेगेट बंद करण्यात आले यानंतर दीपनगर येथील उड्डाणपूलाची उभारणी झाल्यानंतर महामार्गावरील वाहतुक येथून वळती करण्यात आली होती. यामुळे फेकरी ग्रामस्थांना भुसावळ शहरात जाण्यासाठी भुसावळ आयुध निर्माणी किंवा दीपनगर येथून ये-जा करावी लागत होती.

पाणी बाहेर फेकण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी
हे दोनही मार्ग अतिशय फेर्‍याचे पडत असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालय गाठणे किंवा शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असे त्यामुळे गावकर्‍यांनी वेळोवेळी आंदोलने करुन पर्यायी मार्गाची मागणी लावून धरली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गावातून नविन बोगदा तयार केला. गेल्या दोन वर्षांपासून या बोगद्याचे काम सुरु होते. सहा महिन्यांपासून हा बोगदा ये-जा करण्यासाठी खुला करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांना सुविधा होऊन दुचाकी, चारचाकी वाहनांसह बैलगाडी येथून काढणे शक्य होत होते. याठिकाणी साचणारे पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी ते पाणी एका जागेवर एकत्रित करुन ते पंपाद्वारे बाहेर फेकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पहिल्याच पावसात या बोगद्याखाली पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. फेकरीत बांधण्यात आलेला बोगदा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत झालेला नाही. रेल्वेचे काम पूर्ण झाले असून बांधकाम विभागाचे काम अपूर्ण असल्यामुळे पंप बसविण्यात आलेला नाही. याबाबत वेळोवेळी संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत झाल्यानतंर सर्व कामे केली जाते.
निर्मला निकम, सरपंच, फेकरी ग्रामपंचायत

पाठपुरावा करावा
या बोगद्याचे ग्रामपंचायतीला हस्तांतर न झाल्याने त्याच्या देखभालीची जबाबदारी रेल्वेकडेच असल्यामुळे पाणी काढण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे फेकरीवासियांचा मार्गच बंद झाला असून त्यांना आता दीपनगरहून दीड किलोमीटरच्या फेर्‍याने भुसावळ शहरात ये-जा करावी लागत असते. सध्या शाळा, महाविद्यालय सुरु झाले आहे. मात्र शाळकरी विद्यार्थ्यांना सुध्दा सरळ मार्ग बंद झाल्यामुळे लांब पल्ल्याने ये-जा करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने बोगद्याखालील पाणी काढण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने देखील रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.