फेडररची तिसर्‍या स्थानावर झेप

0

लंडन । विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या मरिन सिलीचला हरवणार्‍या रॉजर फेडररला एटीपी क्रमवारीत खूप फायदा झाला आहे. विम्बल्डन स्पर्धेनंतर जाहीर झालेल्या क्रमवारीत फेडररने (6545 एटीपी गुण) पाचव्या स्थानावरून तिसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. 35 वर्षीय फेडररने यामोसमात 14 स्पर्धामध्ये सहभाग घेतला. त्यातील पाच स्पर्धा त्याने जिंकल्या. त्यात ऑस्ट्रेलिया ओपन आणि विम्बल्डन या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचा समावेश आहे. तर अमेरिकेच्या सॅम क्युरेकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेला ब्रिटनचा आघाडीचा खेळाडू अ‍ॅण्डी मरेने (7750 एटीपी गुण) या क्रमवारीतील पहिले स्थान कायम राखले आहे. फेडररचा मैदानाबाहेरील जिगरी दोस्त रफाएल नदालही (7465 एटीपी गुण) दुसर्‍या स्थानावर कायम आहे. सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविच 6325 एटीपी गुणांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

टेनिस क्रमवारी : अ‍ॅण्डी मरे (ब्रिटन), रफाएल नदाल (स्पेन), रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), नोवाक जोकोविच (सर्बिया), स्टॅन वावरिंका (स्वित्झर्लंड, 6140 एटीपी गुण), मरिन सिलीच (क्रोएशिया, 5075 एटीपी गुण), डॉमनिक थिम (नेदरलँड्स, 4030 एटीपी गुण), केई निशीकोरी (जपान, 3740 एटीपी गुण), मिलॉस राओनिक (कॅनडा, 3310 एटीपी गुण), ग्रिगॉर दिमित्रोव्ह (बल्गेरिया, 3160 एटीपी गुण).