न्यूयॉर्क । जुआन मार्टिन डेल पात्रो आणि रॉजर फेडरर यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. डेल पात्रोने सुरुवातीचे दोन सेट हरल्यानंतर पाचव्या सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन सामन्यात डॉमनिक थिएमला हरवून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. या लढतीत डेल पात्रोचा सामना याआधी पाचवेळा ही स्पर्धा जिंकणार्या रॉजर फेडररशी होईल. अर्जेटिनाच्या डेल पात्रोने ऑस्ट्रेलियाच्या सहावे मानाकंन मिळालेल्या थिएमला 1-6, 2-6, 6-1, 7-6, 6-4 असे हरवले. डेल पात्रोने 2009 मधील अंतिम सामन्यात फेडररला हरवून ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. अन्य लढतींमध्ये तिसरे मानाकंन मिळालेल्या फेडररने जर्मनीच्या फिलीप कॉलश्रेयबरचे आव्हान 6-4, 6-2, 7-5 असे संपुष्टात आणले. या विजयामुळे कॉलश्रेयबरविरुद्ध फेडररची कामगिरी 12-0 अशी झाली आहे. अव्वल मानाकंन मिळालेल्या रफाल नदालने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील 50 वा विजय मिळवला. बेल्जियमच्या नवव्या मानांकित डेव्हिड ग्राफिनला 5-7, 6-7, 3-6 असे हरवून आगेकूच करणार्या रशियाच्या आंद्रेय रुबलेव्हशी नदालचा सामना होईल. चौथ्या फेरीत नदालने अॅलेक्झांडर डोलगोपोपॉव्हचा 6-2, 6-4, 6-1 असा पराभव केला. उपांत्य फेरीत नदालचा सामना फेडररशी होऊ शकतो.
वर्षातील शेवटच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवून अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सात ग्रॅण्डस्लॅन जिंकणारी व्हीनस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवणारी वयाने मोठी असलेली महिला खेळाडू ठरली आहे. 37 वर्षीय व्हिनसने झेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्वितोव्हाचा 6-3, 3-6, 7-6 असा पराभव करत उपांत्य फेरीतले स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीत व्हीनससमोर आपल्याच देशातील स्लॉआन स्टिफन्सचे आव्हान असेल.
केविन अंतिम चौघांमध्ये
दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. उपांत्यपूर्व लढतीत केविनने सॅम क्वॅरेचा पराभव केला. केविनने सामन्यात 7-6, 6-7, 6-3, 7-6 असा विजय मिळवत पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.