फेडरेशन चषकावर बंगळूरू एफसीचा कब्जा

0

कटक । बंगळूरू एफसीने मोहन बागानचा 2-0 असा पराभव करून 38 व्या फेडरेशन चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावत कब्जा मिळविला आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सीके विनीतने नोंदवलेल्या शानदार दोन गोलांमुळे बंगळूरूला हा विजय मिळवता आला. ही स्पर्धा जिंकून बेंगळूर एफसीने पुढील वषी होणाऱया एएफसी चषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. मोहन बागानसाठी या मोसमात दुसर्‍यांदा जेतेपदाच्या अगदी जवळ येऊनही अखेर उपजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

छेत्री, वॅटसनच्या अनुपस्थितीत कामगिरी
याआधी आय लीगमध्येही मोहन बागानला उपविजेतेपद मिळाले होते. दोनच दिवसांपूर्वी मोहन बागानने दुय्यम बेंगळूर एफसी संघाला पराभूत केले होते. पण निर्णायक सामन्यात मात्र बंगळूरूने बाजी मारली. विनीतने शानदार प्रदर्शन करीत संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. 107 व 119 व्या मिनिटाला आवश्यक असलेले गोल नोंदवून बंगळूरूचे जेतेपद निश्चित केले. बागानच्या एदुआर्दो व अनासच्या बचावातील त्रुटीचा लाभ घेत त्याने देबजीत मजुमदारला चकवून जादा वेळेत पहिला गोल नोंदवला आणि जादा वेळेतील एक मिनिट बाकी असताना दुसरा गोल नोंदवला. विशेष म्हणजे बंगळूरू संघातून स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री व बचावपटू कॅमेरॉन वॅटसन नसताना त्यांनी हे यश मिळविले.