फेरमूल्यांकनात शहरातील सव्वा लाख मिळकती निश्‍चित !

0

जळगाव : महानगरपालिका हद्दीत मिळकतीची फेरमूल्यांकन आकारणी करण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. शहरात मनपाच्या दप्तरी 96 हजार 945 मिळकती होत्या. सर्वेक्षणानंतर आता 1 लाख 16 हजार मिळकतींची नोंद करण्यात आली असून लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे.त्यामुळे मनपाचे दुप्पटीने उत्पन्न वाढणार आहे.

मनपा हद्दीतील मिळकतींवर मालमत्ता कर लावण्यासाठी मोजमाप करुन आकारणी केली जाते. मनपा प्रशासनाने देखील आकारणी ज्यावेळी केली त्यावेळी आकारणी करताना तळमजला 100 टक्के,पहिला मजला 75 टक्के तर दुसर्‍या मजल्यापेक्षा अधिक मजले असल्यास 50 टक्के यानुसार आकारणी केली जात होती.दरम्यान,केंद्रीय लेखापरीक्षण करण्यात आल्यानंतर आक्षेप नोंदविण्यात आले होते.1997 ते 2017 पर्यंत करण्यात आलेली मालमत्ता कराची आकारणी चुकीच्या पध्दतीने केल्याचा आक्षेप घेण्यात आल्यानंतर फेर मूल्यांकनाचा मनपा प्रशासनाने निर्णय घेतला होता.

तळमजला 100 टक्के, पहिला मजला 75 टक्के, दुसरा मजला 50 टक्के, तळमजला 100 टक्के, पहिला मजला 100 टक्के,दुसरा मजला 95 टक्के, तिसरा मजला 90 टक्के.

सर्वेक्षणात 19 हजार 55 मिळकतींची वाढ

शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करुन फेरमुल्यांकन करण्यासाठी मनपाने 2017 ला अमरावती येथील स्थापत्य एंजन्सीला मक्ता दिला.त्यानुसार एंजन्सीच्या माध्यमातून प्रत्येक मिळकतींना नंबरींग केले.त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जावून मोजमाप केले.घराचे फोटो काढून नकाशे तयार केले.तसेच ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आहे.मनपा हद्दीत आधी 96 हजार 945 मिळकती होत्या. सर्वेक्षणानंतर आता 1 लाख 16 हजार मिळकतींची नोंद करण्यात आली असून तब्बल 19 हजार 55 मिळकतींची वाढ झाली आहे. मालमत्ता करातून मनपाला 28 कोटींचे उत्पन्न मिळायचे.मात्र आता जवळपास 60 ते 65 कोटींचे उत्पन्न मनपाला मिळणार आहे.

अशी होणार आकारणी

मनपा हद्दीतील मिळकतींची आकारणी करताना तळमजला 100 टक्के,पहिला मजला 75 टक्के तर दुसर्‍या मजल्यापेक्षा अधिक मजले असल्यास 50 टक्के यानुसार आकारणी केली जात होती.मात्र आता फेरमुल्यांकनात तळमजला,पहिला मजला 100 टक्के,दुसरा मजला 95 टक्के,तर तिसर्‍या मजल्यापासून 90 टक्के प्रमाणे आकारणी केली जात आहे.तसेच बहुमजली इमारतीत एक ते चौथ्या मजल्यापर्यंत 100 टक्के आकारणी तर पाचव्या मजल्यापासून 5 टक्क्याने वाढ करत 105 टक्क्यांनी आकारणी करण्यात आली असून लवकरच सुनावणी होणार आहे.