फेरीवाला क्रांती महासंघाचे आंदोलन

0

पिंपरी-चिंचवड । पथ विक्रेता अधिनियम 2014 या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, अपात्र विक्रेत्यांना पात्र करुन त्यांना कायद्यानुसार लाभ द्यावेत, नवीन विक्रेत्यांचे सर्वेक्षण करावे, शहर फेरीवाला समितीची बैठक घ्यावी अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि नॅशनल हॉकर्ड फेडरशनने सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राजू बिराजदार, अमित बारवकर, साईनाथ खंडीझोड, मधुकर वाघ, राजू बोराडे, ओमप्रकाश मोरया, सुरेश देडे, अरुणा सुतार, मनीषा राऊत आदी विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नखाते म्हणाले की, महापालिकेच्या शहर विकास आराखड्यात फेरीवाल्यांना 2.5 टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, पालिकेने त्यांची अंमलबजावणी केली नाही. यामुळेच शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरील मंडईची संख्या वाढलेली आहे. पथ विक्रेता अधिनियम-2014 ची अंमलबजावणी करण्यास महापालिका प्रशासन उदासीन आहे. फेरीवाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन केलेल्या शहर फेरीवाला समितीची अद्याप एकही बैठक झाली नाही. शहरातील अनेक विक्रेत्यांचे अजूनही सर्वेक्षण झालेले नाही. पात्र-अपात्र प्रक्रिया प्रलंबित आहे. बायोमेट्रीक सर्वेक्षणही अपूर्णच आहे. या सर्व मागण्या वेळेत सोडविण्यात याव्यात.

दरम्यान, पालिकेचे भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या प्रश्नांबाबत लवकरच आयुक्त श्रावण हर्डीकर यांची वेळ घेऊन त्यांच्यासोबत स्वतंत्र एक बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.