फेरीवाल्यांचा गराडा कायम

0

नवी मुंबई । मुंबईल्या चेंगराचेंगरी घटनेनंतर राज्यातला अतिक्रमण विभागाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असता त्यावर अनेक राजकीय पक्षांनी तोंडसुख घेतले, तर काही वेळापुरती प्रशासकीय यंत्रणेनेही आपली आक्रमकता दाखवली. मात्र याचा काडीमात्रही परिणाम फेरीवाल्यांनावर झाला नसून आज पुन्हा ठिकठिकाणी फेरीवाल्यांचा गराडा कायम असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या या प्रश्‍नावर तोडगा निघणार कधी यावर प्रश्‍नचिन्ह असून, अतिक्रमण विभाग करतो काय असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी ज्या वेळी अतिक्रमण विभागाचा ताफा निघतो त्या आधीच कारवाईची माहिती फेरीवाल्यांना मिळत असल्याने अतिक्रमणची गाडी दिसताच फेरीवाले पळून जातात आणि पुन्हा गाडी जाताच पुन्हा त्या ठिकाणी येऊन बसतात.

अतिक्रमण विभागाची कारवाईही मंदावल्याने आता हे रस्ते फेरीवाल्यांच्या गर्दीने घुसमटू लागले आहेत. तर घणसोली व दिघा येथील फेरीवाल्यांना परवाना दिलेला नाही. घणसोलीमध्ये रविवारच्या आठवडा बाजारात फेरीवाल्यांची भाऊगर्दीच असते. दिघा येथेही काही फेरीवाले आहेत. मुंढे यांच्या काळात वाशी सेक्टर-9 येथील रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करून त्यांना वाशी डेपोशेजारी बसवण्यात आले होते. आता या ठिकाणीच फेरीवाल्यांची गर्दी झाली आहे. पालिकेने काही फेरीवाल्यांना वाशी डेपोजवळील मंडईत बसण्यासाठी परवाने दिले आहेत, परंतु त्या ठिकाणी विक्री होत नाही, म्हणून या फेरीवाल्यांनी वाशी सेक्टर 9 मधील रस्ता काबीज केला आहे.

आठवडा बाजारांमुळे फेरीवाले वाढताहेत
शहरात अनेक रस्त्यांच्या कडेला गॅस सिलिंडर ठेवून खाद्यपदार्थ बनवले जात आहेत. आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्विकारल्यानंतर नव्याचे नऊ दिवस कारवाई केली. परंतु, आता सर्वच प्रभागांत फेरीवाल्यांची गर्दी झाली आहे. शहरात विविध ठिकाणी आठवडा बाजार भरतो. घणसोली, तुर्भे, शिरवणे येथील आठवडा बाजार प्रसिद्ध आहेत. या बाजारांत मानखुर्द, गोवंडी, चेंबूर परिसरातून फेरीवाले येतात. आठवडा बाजारात संपल्यावर ते रस्त्यांवर बसून विक्री करतात. त्यामुळे आठवडा बाजारांमुळे फेरीवाले वाढतच आहेत.

फेरीवाल्यांचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केलेले असताना महिन्याकाठी कोटयवधींची हप्तेवसुली होत असल्याचा आरोप फेरीवाला संघटनांकडून होत आहे. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात वाशी, नेरुळ, बेलापूर, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, तुर्भेतील पदपथ आणि रस्ते मोकळा श्‍वास घेत होते, मात्र त्यांची बदली झाल्यापासून या पदपथ आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे.