फेरीवाल्यांना रोज द्यावे लागणार 25 रुपये

0

पुणे । शहरात विविध भागात व्यवसाय करण्यार्‍या फेरीवाल्यांना प्रति दिन 25 रुपये शुल्क आकारणी करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्य सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून मान्यतेनंतर फेरीवाल्यांकडून प्रति दिन 25 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

राष्ट्रीय फेरीवाला धोरण आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार महापालिकेने फेरीवाला/पथारी व्यावसायिकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केले होते. त्यांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात आले होते. फेरीवाल्यांचे पुनर्वसन आणि दर निश्चितीसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमण्यात आली होती. महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत धनकवडी आणि नगररोड या दोन क्षेत्रीय कार्यालयांचा अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणचे दर निश्चित करण्यात आले. त्यानुसार, पथारी व्यावसायिकांचा प्रकार आणि त्यांच्या व्यवसायाचे ठिकाण यानुसार प्रतिदिन किमान 25 ते कमाल 200 रुपयांपर्यंतचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्या संदर्भातील सविस्तर धोरण लवकरच सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.