फेरीवाल्यांवर करण्यात येणार्‍या कारवाईत भेदभाव

0

नवी मुंबई । घणसोली विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यावर करण्यात आलेली कारवाई ही भेदभाव करणारी असून, सरसकट सर्वांवर सारखीच करा अशी मागणी सुधाकर थोरात या वयोवृद्धांनी सहाय्यक आयुक्त नागरे यांची समक्ष भेट घेऊन केली. घणसोली परिसरात अनधिकृत फेरीवाल्यावर अतिक्रमण विभाग दररोज कारवाई करतात. परंतु, कारवाई करताना विशिष्टच फेरीवाल्यावर कारवाई केली जाते. काही व्यावसायिकांवर कारवाई होते. परंतु, काही जणांवर कारवाई होत नसल्याचे थोरात यांनी संताप व्यक्त करून सहायक आयुक्त दत्तात्रेय नागरे यांना सांगितले. अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचे काही फेरीवाल्यावर चांगले संबंध असल्याने व त्यांना त्यांच्याकडून लक्ष्मी दर्शन घडत असल्याने भेदभाव प्रकारची कारवाई अतिक्रमण करत असल्याचे सुधाकर थोरात यांनी स्पष्टपणे सहायक आयुक्तांना सांगितल्याने सर्वांचे धाबे दणाणले.

सर्वांवरच कारवाईचे आदेश
वयोवृद्ध नागरिक सुधाकर थोरात म्हणाले की, माझाही डी मार्टलगत मोकळ्या जागेवर अगरबत्तीचा व्यवसाय आहे. मी छोट्या टेबलवर स्वतः अगरबत्ती बनवून सायंकाळी अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करतो. माझ्या छोट्या व्यवसायावर कारवाई होते.परंतु, माझ्यासमोरील सेंटर, दुसरे इतरही मोठ्या व्यवसायावर कारवाई होत नाही असे का? असाही त्यांनी मनपा अधिकार्‍यांसमोर प्रश्‍न उपस्थित केला. या नंतर सहाययक आयुक्त दत्तात्रेय नागरे यांनी अतिक्रमण अधिकार्‍यांना बोलावून सरसकट सर्वांवरच कारवाई करण्याचे आदेश दिले.