भंडारा-गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील ४९ बुथवर मतदान सुरू झाले आहे. मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारीमुळे याठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. तत्पूर्वी, मतदान यंत्रांमध्ये कुठेच बिघाड झालेला नाही त्यामुळे कुठेही फेरमतदान होणार नाही, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली होती. नंतर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील ४९ बुथवर फेरमतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. आज सकाळी सात वाजता या ठिकाणी मतदानास सुरूवात झाली. पुन्हा मतदान घेण्यात येत आहे मात्र मशीनमधील बिघाड काही थांबण्याचे नाव घेत नसून आज पुन्हा काही ठिकाणी मशीनमध्ये बिघाड आढळून आले आहे. जसे इव्हीएमचे बटन दाबल्यानंतर १० मिनिटांनी होतेय मतदान पूर्ण होत आहे. माताटोली मतदानकेंद्रावरील २३३ क्रमांकाच्या बुथवरील इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे प्रकार समोर आले आहे.
जिल्हाधिकाऱ्याची बदली
दरम्यान, निवडणुकीदरम्यान, गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे त्यांच्यावर निवडणूक प्रक्रिया सुरळीत करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करीत बदली केली आहे. त्यामुळे त्यांच्याजागी आता कादंबरी बलकवडे या गोंदियाच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
पालघरमधूनही तक्रारी
कैरानामधील ७३, गोंदिया-भंडारामधील ४९, तसेच नागालँडमधील एका बुथवर फेरमतदान होईल, असा आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पालघरमधूनही अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र, तेथे कोणत्याही बुथवर फेरमतदान होणार नाही. दरम्यान, देशभरातील ४ लोकसभा मतदार संघात आणि १० विधानसभा मतदार संघात २८ मे रोजी पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. दरम्यान, देशभरात बहुतांश मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये बिघाड होऊन ती बंद पडल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, भंडारा-गोंदिया मतदार संघात सुमारे ४५० केंद्रांवर इव्हीएम बंद पडल्याने निवडणूक प्रक्रिया ठप्प झाल्याची तक्रार भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.