नवी दिल्ली : आता आधार कार्ड हिच सामान्य नागरिकांची सोशल ओळख होणार आहे. केंद्र सरकारकडून प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लागू करण्यात येत आहे. आता या यादीमध्ये सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय माध्यम फेसबुकचाही समावेश झाला आहे. कारण फेसबुकवर नवीन अकाऊंट उघडण्यासाठी युझरला ‘आधार कार्ड’चा आधार घ्यावा लागणार आहे. फेसबुक इंडियाने याबाबत माहिती दिली आहे. सध्या हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला असून, नवीन फेसबुक अकाऊंटसाठी आधारकार्डवरील नाव टाकण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र आधारकार्डवरीलच नाव टाकण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. तसेच, फेसबुकने आधारकार्डवरील नाव टाकण्याचा पर्याय दिला असला तरी आधारकार्ड क्रमांकाबाबत विचारणा करण्यात आलेली नाही. अचानक सुरू झालेल्या या पर्यायामुळे युझर्सच्या भुवया मात्र उंचावल्या गेल्या आहेत. नव्या नियमावलीमुळे फेसबुकवर मोठ्या प्रमाणात असलेल्या मुली व स्त्रियांची संख्या आता झपाट्याने कमी होऊ शकेल, असा अंदाजही माध्यमतज्ज्ञांनी व्यक्त केला. तसेच, बबल्या आता बबली बनून चॅटिंगही करू शकणार नाही.
जास्तीत जास्त लोकांनी खर्या नावाने वावरावे!
फेसबुकवर नवीन अकाऊंट सुरु करायचे असेल तर तुमच्याकडे आधारकार्ड असणे गरजेचे होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. फेसबुकने प्रायोगिक तत्वावर नवीन फेसबुक अकाऊंटसाठी आधारकार्डवरील नाव टाकण्याची सोय उपलब्ध करुन दिली. जास्तीत जास्त लोकांनी फेसबुकवर खर्या नावांनी अकाऊंट सुरु करण्याच्या दृष्टीने ही चाचपणी करण्यात येत असल्याचे कळते. प्रायोगिक तत्वावर असल्याने अगदीच कमी लोकांना अशाप्रकारचे नोटीफिकेशन अकाऊंट सुरु करताना दिसले असले तरी अद्याप आधारकार्डवरील नावाची सक्ती करण्यात आलेली नाही. नवीन फिचर्सबाबत बोलताना फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा प्रयोग सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. सध्या या फिचर्सच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. तसेच आधारवरील नाव टाकण्याची युझरला सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र लोकांच्या खर्या आयुष्यातील नावे सोशल मीडियावर सहजपणे शोधता यावीत, त्याचे मित्र, कुटुंबीय आणि ओळखीचे लोकं त्यांच्यासोबत सहजपणे जोडले जावेत, यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.
नेटकर्यांमध्ये पडले दोन गट
याआधी केंद्र सरकारने बँक अकाऊंट, मोबाईल क्रमांकासह इतरही ठिकाणी आधार लिंक करण्याची सक्ती केली होती. यावर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता फेसबुकही आधारकार्डचा आधार घेणार असल्याने यावर नेटकर्यांची काय प्रतिक्रिया उमटतील हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. तसेच, याबद्दल लगेच नेटकर्यांमध्ये या संदर्भातील वादावरून दोन गट पडले आहेत. काहीजणांना यामध्ये काहीतरी घोटाळा दिसून येत आहे तर काही जणांच्या मते हे योग्य असून, खरे नाव टाकण्याची सक्ती केल्यास गैर काय? असा प्रश्न ते करीत आहेत.