नाशिक- सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचा वापर करुन महाराष्ट्रातील तब्बल ६५८ महिलांना छळणाऱ्या नाशिकमधल्या २६ वर्षाच्या युवकाला नाशिक सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. विश्वजीत जोशी असे आरोपीचे नाव आहे. विश्वजीत स्वत: नेकेड होऊन फेसबुकवरुन या महिलांना व्हिडिओ कॉल करायचा व चेहरा लपवून ठेवायचा. पुण्यातील २० ते ३५ वयोगटातील जवळपास १५ मुलींना त्याने असा त्रास दिला. पीडित तरुणीने नाशिक सायबर गुन्हेशाखेकडे तक्रार दाखल करताच विश्वजीत जोशीला २४ तासांच्या आत मंगळवारी अटक करण्यात आली.
अश्लील मेसेज
२६ वर्षीय तक्रारदार तरुणीला मागच्या आठवडयात जोशीने फेसबुक मेसेंजरवरुन व्हिडिओ कॉल केला. समोरचे दृश्य पाहून या तरुणीला धक्काच बसला. समोर विवस्त्र अवस्थेत असलेला अज्ञात तरुण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार १५ मे पासूनच तिला सोनल शितोळे नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन अश्लील मेसेज आणि फोटो येत होते. जेव्हा तिने अकाऊंट ब्लॉक केले तेव्हा दोन दिवसांसाठी तिचा त्रास थांबला पण त्यानंतर पुन्हा सोनल जामल या अकाऊंटवरुन तिला अश्लील फोटो आणि मेसेज येण्यास सुरुवात झाली.
२० बनावट अकाऊंट
पोलीस तपासात विश्वजीतने वेगवेगळया महिलांच्या नावाने २० बनावट अकाऊंट उघडली असल्याचे समजले. सावज हेरल्यानंतर विश्वजीत आधी सभ्य गृहस्थाप्रमाणे बोलायचा पण नंतर अचानक तो अश्लील चॅटिंग सुरु करायचा. विश्वजीतचे वडिल सेवानिवृत्त झाले असून त्याचा मोठा भाऊ इंजिनियर तर आई गृहिणी आहे. त्याने कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक लॅपटॉप, एक मोबाइल फोन आणि सीम कार्ड जप्त केले आहे. विश्वजीतने २० बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महाराष्ट्रातील जवळपास ६५८ महिलांचा अशा प्रकारे छळ केला. पोलिसांनी विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.