मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांचा अवमान होईल अशा पध्दतीत फेसबुक पोस्ट करून बदनामी करणार्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात शिवसेना शहरप्रमुख गणेश टोंगे (रा.मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत अशोक गावंडे विरोधात मुक्ताईनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुकवर टाकला बदनामीकारक मजकूर
मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास तालुक्यातील तालखेडा येथील दीपक गजानन वाघ या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने फेसबुकवर आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी करणारी पोस्ट टाकण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर टोंगे यांनी माहिती घेतली असता अशोक गावंडे नावाच्या फेसबुक प्रोफाईलवर हा प्रकार घडल्याचे दिसून आले. मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा आणि कोहाळा येथील भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. या पक्ष प्रवेशा प्रसंगीच्या फोटोवर अशोक गावंडे याने डुकरे, ससे आदींसह अन्य प्राण्यांचे फोटो टाकून ते आपल्या प्रोफाईलवरून शेअर केल्याचे दिसून आले. यासोबत आमदार पाटील यांच्या फोटोवरही हाच प्रकार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेची बदनामी झाल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.