फेसबुकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी

0

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने असलेल्या एका फेसबुक अकाऊण्टवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावाने आक्षेपार्ह फोटो आणि मजकूर टाकून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पुणेच्या सोशल मीडियाप्रमुख आणि युवती अध्यक्षा मनाली भिलारे यांनी फिर्याद दिली आहे.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
मनाली भिलारे या 13 डिसेंबररोजी फेसबुक अकाऊण्ट पाहात असताना हा प्रकार त्यांना दिसून आला. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने असलेल्या त्या फेसबुक पेजवर 14 लाखांवर फॉलोअर्स आहेत. या पेजवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनील तटकरे व इतर नेत्यांच्या नावाचा व फोटोचा वापर करून आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो टाकल्याचे आढळले. या पेजवर राष्ट्रवादीचे चिन्ह असलेल्या घड्याळाचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. हे फेसबूक पेज चालविणारा व्यक्ती राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी करत असल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.