फेसबुक दिंडीच्या माध्यमातून नेत्रदानाचा उपक्रम

0

थकलेल्या देहांना अनुभवता येणार संपूर्ण दिंडी सोहळा

वाघोली। वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संस्थापक व फेसबुक दिंडीचे सदस्य अमोल काशिनाथ गावडे आणि फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील राम मोरे यांनी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे, थकलेले देह यांना संपूर्ण दिंडी सोहळा व पांडुरंगाला डोळे भरून पाहता यावे हा दृष्टिकोन ठेवून अतिशय सुंदर अशा फेसबुक दिंडीची निर्मिती केली. यामध्ये वारीचे विविधंगी चित्रीकरण करण्यात आले. तसेच वारी दरम्यान विठ्ठलाच्या नामस्मरणात तहानभूक विसरून तल्लीन झालेले वारकरी यांचा रंगलेला सोहळा अतिशय सुंदररीत्या चित्रित करण्यात आला आहे. आदर्श शिंदे यांनी फेसबुक दिंडीमधील आपल्या मधुर आवाजात भक्ती गीत गायले आहे तर तारा आराध्य यांनी सुरेख शब्द रचना देऊन हर्ष-विजय आणि केदार दिवेकर यांनी संगिताचा साज दिला असून ‘रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी’ या हृदयस्पर्शी गाण्याची निर्मिती अमोल गावडे यांनी केली आहे.

जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे हे 333 वे वर्ष आणि फेसबुक दिंडीचे 8 वे वर्ष असून 2016 साली फेसबुक दिंडी टीमने ‘पाणी वाचवा’ हा जलसंधारण मोहिमेचा उपक्रम राबवला होता. या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यावर्षी फेसबुक दिंडी नेत्रवारी या उपक्रमातून मरणोत्तर नेत्रदान हा उपक्रम राबवत आहे. नागरिकांकडून नेत्रदानाचे फॉर्म भरून घेऊन दृष्टीहीनांना दृष्टी देवून पांडुरंगाला डोळेभरून पाहता यावे व वारीचा संपूर्ण सोहळा अनुभवता हाच प्रामाणिक प्रयत्न या उपक्रमातून केला गेला आहे.