डॉ.युवराज परदेशी: फेसबुक व व्हाट्सअॅपचे क्लोन तयार करुन सायबर भामट्यांनी जळगाव जिल्ह्यातील 17 जणांची फसवणूक केल्याची पोलिसांच्या दप्तरी नोंदी आहे. यात शहरातील एका बड्या वकिलाच्या नावावर 15 हजाराचा भूर्दंड त्यांच्या फे्रंडलिस्टमधील एका मित्राला बसला आहे. तर दोन दिवसांपूर्वी एका शिक्षकाची तिन हजाराची फसवणूक झाली आहे. सोशल मीडियावरील फेसबूक व व्हाट्सअॅपचे अकाऊंट हॅक करुन त्याचे जसेच्या तसे क्लोन करायचे व त्यावरुन फे्रंडलिस्ट मधील मित्र-मैत्रिणींना मेसेज पाठवून हॉस्पीटलमध्ये अर्जंट पैशांची गरज असल्याचे सांगून पैशांची मागणी करायची, अशा प्रकारे सायबर भामटे अनेकांना गंडवत असल्याचे समोर येत आहे. कोरोना व लॉकडाऊनच्या काळात पारंपरिक गुन्हेगारीचा आलेख कमी होत असताना सायबर गुन्हेगारी मात्र वाढत आहे. कोरोना संकटाच्या काळात नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या अनेक युक्त्यांचा वापर सायबर भामट्यांनी सुरू केला आहे.
सोशल मीडिया हा अनेकांच्या जीवनाचा अभिवाज्य घटक झाला आहे. जगात कोट्यवधी लोक सोशल मीडियावर सक्रिय असतात. फेसबुक हे लोकप्रिय माध्यम आहे. यावर अनेकजण स्वत:ची माहिती, फोटो अपलोड करत असतात. गेल्या दोन-तिन वर्षांपूर्वी अनेकांचे फेसबुक अकाउंट हॅक करत त्या अकाउंटचा अॅक्सेस हॅकर स्वतःकडे घेऊन अकाउंट युझर ला त्याचा अॅक्सेस त्यास परत देतो असे सांगुन पैशाची मागणी करण व पैसे नाही दिले तर त्याचे फेसबुक अकाउंट वर अश्लिल फोटो व व्हिडिओ अपलोड करण्याचे प्रकार समोर आले होते. त्यानंतर ऑनलाईन बँकिंग फ्रॉडचे प्रमाण वाढले. जे अजूनही सुरु आहेत. यात अमूक एका बँकेतून बोलत असल्याचे भासवून ग्राहकांकडून त्यांच्या बँक अकाऊंटची माहिती घेवून त्यांच्या पैशांवर डल्ला मारायचा तर कधी परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष, गुंतवणुकीचे आमिष, लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून सामान्यांना हातोहात गंडा घातला जाण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. कोणतीही बँक आपला पासवर्ड, खाते नंबर वा इतर गोपनीय माहिती विचारत नाही, असे बँकाकडून वारंवार सांगण्यात येत असते. तसे मेसेजही बँका आपल्या ग्राहकांना पाठवत असतात. तरीही सायबर भामटे आपला सावज हेरुन त्याला गंडवितातच! ऑनलाईन खरेदी करतानाही ग्राहकांची अनेकवेळा फसवणूक होते.
बहुतांश नागरिक ऑनलाईन खरेदीला पसंती देतात. याचा फायदा घेऊन एखादी फेक वस्तू जसे की मोबाईल, पुस्तके, अन्य गृह उपयोगी वस्तू किंवा अगदी पाळीव प्राणी विकायला आहेत अशी जाहिरात करतात. ही लिंक एखाद्या ई कॉमर्ससारख्या वेबसाईट सारखी दिसायला पण फेक लिंक असते. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी केला जातो. अन्य एका प्रकारामध्ये नागरिकांना एक ई-मेल किंवा मेसेज येतो कि तुम्ही काही कर भरायचा बाकी आहे व तो तुम्ही सोबतच्या लिंकवर क्लिक करुन एका विशिष्ट तारखेपर्यंत भरा अन्यथा तुमच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सदर लिंक ही सरकारी कर भरायच्या लिंक सारखीच दिसते, पण फेक लिंक असते. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते त्याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात. लॉकडाऊनच्या काळात आणि ‘वॅर्क फ्रॉम होम’ची संस्कृती वाढल्याने इंटरनेटवर सर्फिंगचेही प्रमाण वाढले आहे. सायबर भामट्यांची याचाही फायदा उचलला. नागरिकांचे फेसबुक अकाउंट हॅक करुंन त्याचे नियंत्रण स्वतःकडे घेऊन त्याचे फ्रेंडलिस्ट कॉन्टॅक्ट मधील असणारे सर्वांना मला पैशाची गरज आहे असे मेसेज पाठवून तीन हजारापासून 15 हजार रुपयांची मागणी करतात. सदर मागणी ही आपला मित्र अडचणीत असल्यामुळें करीत आहे असे समजून समोरचा व्यक्ती कोणतीही खात्री न करता त्यास पैसे पाठवित असतो. यावर सहसा कुणालाही शंका येत नाही कारण ते अकाऊंट अगदी ओरिजनल अकाऊंट सारखे सेम टू सेम असते.
अगदी त्यातील फ्रेंडलिस्टसह अन्य सर्व बाबीही सारख्याच दिसतात. यामुळे कुणाचाही त्यावर चटकन विश्वास बसतो. जळगाव जिल्ह्यातही अशा प्रकार फसवणूक होण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढत आहे. फिशिंग, स्पॅमिंग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील यंत्रणांची स्कॅनिंगच्या माध्यमातून महत्वाची माहिती चोरणे, अशा घटनांमध्ये तब्बल तिपटीने वाढ झाली आहे. हॅकिंग, स्पॅम मेलद्वारे मालवेअरचा शिरकाव आणि अशाच इतर असुरक्षित प्रकारांचा वापर करून सायबर हल्ले होण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा 2013 हे सायबर क्षेत्रातील सर्वसमावेशक सायबर सुरक्षा धोरण पहिल्यांदाच भारत सरकारने आणले. या धोरणात काही महत्वाच्या मुद्यांचा समावेश करण्यात आला होता. यात राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्र, चाचणी केंद्र, मालवेअर देखरेख केंद्र, राष्ट्रीय गंभीर माहिती सुरक्षा केंद्र यांची उभारणी करण्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र सायबर गुन्हेगारांनी अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपले जाळे विस्तारल्यामुळे भारत सरकारने आता नवे सायबर सुरक्षा धोरण 2020 आणले जाईल अशी घोषणा केली आहे. असे असले तरी आर्टिफिशियल इंटेलिजेंस, अत्याधुनिक यंत्रसामग्री, इंटरनेट-सक्षम साधने आणि प्रचंड माहिती यासारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे सायबर हल्ल्याचे क्षेत्र आता अतिशय गुंतागुंतीचे झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे. जर असे संशयास्पद काही ई-मेल किंवा मेसेज किंवा फोन आले तर त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका.
कुण्या मित्राच्या नावाखाली फोन पे किंवा गुगल पे सारख्या अॅपच्या माध्यमातून पैशांची मागणी करत असेल तर आधी त्या मित्राला फोन करुन खात्री करुन घ्या. कारण सायबर भामटे अद्यावत तंत्रज्ञान हाताळण्यात सराईत झाले आहेत. याकरीता स्वत:ची फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेणे हाच सर्वात सुरक्षित पर्याय आहे.