फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपमुळे मुलांची एकाग्रता भंग पावत चालली आहे!

0

पिंपरी-चिंचवड : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर तासन्तास चॅटींग करणे, इंटरनेटवर सतत ऑनलाईन राहणे अशा गोष्टींमुळे मुलांचा खूप वेळ वाया जातो. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपमुळे मुलांची एकाग्रता भंग पावत चालली आहे. त्यामुळे किमान पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व प्रसिद्ध वक्ते विवेक वेलणकर यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा गु्रप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘इयत्ता दहावी, बारावीनंतर पुढे काय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवाद मार्गदर्शन करताना वेलणकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, उपप्राचार्य डॉ. जयश्री मुळे, प्रा. वनिता कुर्‍हाडे, विशाखा वेलणकर उपस्थित होते.

पालकांनी वेळीच सावध व्हावे
परिसंवादाला उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना विवेक वेलणकर पुढे म्हणाले, प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी जशा आवश्यक आहेत; तसेच आजच्या तरुणाईसाठी स्मार्ट फोन गरजेचा झाला आहे. इयत्ता दहावी तसेच बारावीचे वर्ष हे विद्यार्थी जीवनातील महत्त्वाची वर्ष आहेत. परंतु मुलांना त्याचे महत्त्व कळत नाही. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर वेळ वाया घालवण्यात मुलांना रस वाटतो. हे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घातक असून, पालकांनीदेखील वेळीच सावध झाले पाहिजे, असे आवाहन वेलणकर यांनी केले.

पालकांनो, मुलांचा कल ओळखा
करिअरची निवड कशी करावी, याबद्दल मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्र कांकरिया म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करता कामा नये. आपल्या मुलाचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, याबाबत पालकांनीदेखील निरीक्षण केले पाहिजे. विद्यार्थ्यांनीदेखील केवळ गुण मिळविण्यासाठीच अभ्यास न करता अभ्यास हा आनंद मिळविण्यासाठी केला पाहिजे. आत्मविश्वास, अभ्यासातील एकाग्रतेमुळे यशस्वी होता येते. करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी आपली शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्षमता, आवड, स्वाभाविक कल आदींचा विचार करावा. आर्टस्, सायन्स, कॉमर्स, पदवीधरांनी विविध स्पर्धा परीक्षा देऊन तहसीलदार, जिल्हाधिकारी होण्यासाठी योग्य अभ्यास, मार्गदर्शन घेण्याचे आवाहन डॉ. कांकरिया यांनी केले.

प्लेसमेंटबाबत मुलांना मार्गदर्शन
प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी इंजिनिअरींग क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम व प्रवेश मिळविण्याबाबत मार्गदर्शन करून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना विविध 40 कंपन्यांच्या माध्यमातून प्लेसमेंटबाबत माहिती दिली. प्रास्ताविकात कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले की, पालकांनी आपल्या इच्छा मुलांवर न लादता मुलाच्या आवडी-निवडी ओळखल्या पाहिजे. मुलात जर करिअर करण्याची प्रबळ इच्छा व ध्येय साध्य करण्याची जिद्द असेल तर आयुष्यात कितीही आव्हाने आली तरी त्यावर मात करून तो आयुष्यात यशस्वी होतो, असे ते म्हणाले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली देशपांडे यांनी तर आभार उपप्राचार्या प्रा. वनिता कुर्‍हाडे यांनी मानले.