नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये सोशल मीडियाचा देखील समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. दरम्यान फेसबुकने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. फेसबुकने काँग्रेसशी संबंधित ६८७ पेजेस आणि अकाउंट डिलिट केले आहेत. काँग्रेसशी संबंधित काही लोकांनीच ही फेसबुक पेजेस तयार केली होती, त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
काँग्रेसशी संबंधित या फेसबुक पेज आणि अकाउंटवरून खोट्या बातम्या, खोटी माहिती प्रसारीत केली जात होती. त्यामुळे हे पेजेस हटविण्यात आल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकवर खोटे अकाउंट बनवून यूजर्सने स्वत:ची खरी ओळख लपवली होती. हे लोक काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित लोकांशी संबंधितच होते, हे आमच्या तपासातून उघड झाले आहे असे फेसबुकचे सायबर स्पेस पॉलिसी प्रमुख नथानियल ग्लिकर यांनी सांगितले. काँग्रेसशी संबंधित या फेसबुक पेजेसची तपासणी करण्यात आली होती. खोटी अकाउंट तयार करून ही पेजेस तयार करण्यात आली होती आणि त्यावरून संबंधितांनी स्वत:चा अजेंडा राबवायला सुरुवात केली होती. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि इतर राजकीय पक्षांवर टीका करण्यात येत होती, असे फेसबुकने म्हटले आहे.