फैजपुरचे आराध्य दैवत खंडोबाच्या यात्रेस प्रारंभ

0

फैजपूर । महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश व गुजरातमधील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील खंडोबाच्या वार्षिक यात्रेस आजपासून प्रारंभ झाला. हे जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रध्दा आहे. गतवर्षी अवकाळी पाऊस व दुष्काळाचा या यात्रेवर प्रतिकूल परिणाम झाला होता. गतवर्षाच्या तुलनेत यंदा या यात्रेत ग्रामीण भागातील भाविकांची गर्दी वाढलेली जाणवत असल्याने व्यापार्‍यांनाही चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे.

दुकाने गजबजली या यात्रेचे वैशिष्ट्य असलेली सुकामेवा, फराळ-मिठाई, मुलांची खेळणी रेवडी, जादुचे प्रयोग, मौत का कुृआ आदी दुकानदारांनी आठवडाभरापुर्वीच जागा बुक करुन दुकाने थाटलेली आहेत . तमाशा व सर्कशीचे खेळही या यात्रेत येतात.

लेवा पाटीदारांचे कुलदैवत
हे देवस्थान खान्देशातील लेवापाटीदार समुदायाचे कुलदैवत आहे. भाविक याच यात्रेत श्रध्देने आपल्या बाळांचे कर्णछेदन करतात. मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठीही भाविक येथे येतात. होळीच्या दिवशी मानकर्‍यांच्या हातून मुर्तीची पूजा करुन मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. महंत घनश्यामदास महाराज अनेक वर्षांपासून या देवस्थानचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. या देवस्थानाने मंगल कार्यालयाचीही उभारणी केलेली आहे. दरवर्षी या यात्रेत नगरपरिषदेकडून आवश्यक सुविधा पुरविल्या जातात. पोलिस खात्याकडून सुरक्षा व बंदोबस्त पुरविला जातो.