फैजपूर- महिन्याभरापूर्वी लग्न असलेल्या भावी नवरदेवाचा अल्पशा आजारातच हृदय विकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील जनशक्ती कॉलनीत सोमवारी सायंकाळी घडली. उमेश नंदकिशोर पाटील (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. उमेश पाटील हा पुणे येथे नोकरीला होता व त्याचे पुढील महिन्यात 14 मार्च रोजी लग्न सुद्धा निश्चित झालेले होते. एकीकडे घरात लग्नाचा आनंद घरातील सर्वांची लग्नाची लगबग सुरू होती. वडील व भाऊ लग्नपत्रिका वाटण्यात व्यस्त होते. उमेश घोड्यावर बसणार याचा त्याच्या मित्र परीवाराला आनंद होता मात्र उमेशच्या नशिबात दुसरच लिहिले असल्याने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना शहरातील जनशक्ती कॉलनीत घडली. गेल्या चार दिवसांपूर्वी उमेश यांची प्रकृती बिघडली. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरू होते मात्र सोमवारी या आजारातच उमेश याला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने घरच्यांनी एकच टाहो फोडला. घरातील आनंदी वातावरणात क्षणात दुःखात बदलून गेले. रात्री उशिरा उमेश याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात वडील तथा मधुकरचे कर्मचारी नंदकिशोर पाटील आई व भाऊ असा परीवार आहे.