फैजपूर– शहरातील किरंगे वाड्यातील रहिवासी मोहन नंदकिशोर किरंगे (30) या तरुणाने यावल रोडवरील नितीन कोल्हे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 2 रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली असलीतरी विहिरीला पाणी अधिक असल्याने शनिवारी मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मोहन किरंगे हे 1 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान त्याच्या वाड्यातील मित्रांना शेवटचा दिसले मात्र त्या नंतर ते कोणालाही दिसले नाहीत. 2 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान फैजपूर यावल रस्त्यावर फैजपूर येथील रहिवाशी नितीन कोल्हे यांची रस्त्याच्या बाजूलाच विहिर असून त्या विहिरीच्या बाहेर मोहन याचे बूट एका व्यक्तीला दिसले. त्यावरून ते बूट त्याचेच असल्याची खात्री त्याच्या लहान भाऊला झाली. त्या वरून मारुळ येथील पट्टीचा पोहणारा व्यक्तीला बोलावण्यात आले. दुपारपासून मोहनचा विहिरीत शोध सुरु होता. विहिर खूप खोल व पाणी जवळपास 40 ते45 फूट असल्याने रात्री मृतदेह सापडला नाही. शनिवार, 3 रोजी पुन्हा सकाळपासून शोध घेतला व सकाळी पावणे अकरा वाजता मृतदेह हाती लागल्यानंतर बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.