फैजपूरच्या जे.टी.महाजनमध्ये ऑक्सीजन बेडची होणार उभारणी
कोविड रुग्णांचे हाल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संत जनार्दन महाराजांचा पुढाकार
सावदा (दीपक श्रावगे) : जिल्ह्याप्रमाणेच सावदा व परीसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे दवाखाने फुल्ल झाले आहेत तर अत्यावश्यक रुग्णांना ऑक्सीजन मिळत नसल्याची बाब पुढे आल्यानंतर या समस्येवर मात करण्यासाठी फैजपूर येथील न्हावी मार्गावरील जे.टी.महाजन पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉस्टेलला असलेल्या कोविड सेंटरमध्ये 50 खाटांचे ऑक्सीजन सेंटर सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. खर्चिक यंत्र सामुगीबाबत महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या नेतृत्वात 1 रोजी बैठक घेण्यात आली व त्यात मदतीचे आवाहन करण्यात येताच अनेक दाते मदतीसाठी पुढे सरसावले.
अनेक दात्यांचे हात मदतीसाठी सरसावले
सावदा व परीसरातील कोरोना रुग्णांना ऑक्सीजन मिळण्यासाठी त्रास न होण्यासाठी स्थानिक स्तरावर लोकसहभागातून ऑक्सीजनची व्यवस्था व्यवस्था होण्यासाठी 1 रोजी येथील विश्रामगृहात केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी व ट्रांसपोर्टचालक यांची एक बैठक घेण्यात आली. यात सर्व उपस्थित मान्यवर यांनी या सामाजिक कामासाठी सर्वानि सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. ट्रान्सपोर्ट चालक यूनियन यांनी 50 हजारांची, नरेंद्रसेठ नारखेडे यांनी 50 हजारांची, सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दहाजारांची, नगरसेवक गुड्डू सेठ यांनी पाच हजारांची मदतीपोटी देणगी जाहीर केली.
यांची बैठकीला उपस्थिती
यावेळी फैजपूरयेथील सतपंथ मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज, स्वामी नारायण गुरुकुल सावदाचे उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदासजी, प्रांताधिकारी कैलास कडलग, सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी, सहा.निरीक्षक देविदास इंगोले, नरेंद्र नारखेडे, नगरपालिका कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, केळी व्यापारी, ट्रान्सपोर्ट चालक, व्यापारी, शेतकरी आदी उपस्थित होते.
रुग्णांना मोठा दिलासा मिळणार
यावेळी उपस्थित संतांनी सध्या कोरोनासारख्या आपत्तीत खर्या अर्थाने मदतीची गरज असून अश्या वेळी केलेल्या मदतीचे महत्व मोठे असून यांचे पुण्य सर्वात मोठे असते, असे मनोगतात सांगितले. या कामास सुमारे पाच लाख रुपयांची आवश्यकता असून यामुळे सुमारे 50 ऑक्सीजनयुक्त खाटा उपलब्ध होऊन येथील रुग्णांना याचा मोठा दिलासा मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.