फैजपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांविरुध्द न्यायालयात याचिका

0

फैजपूर : नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा महानंदा रविंद्र होले (टेकाम) यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका इलेक्शन पिटीशन क्रमांक 17/2016 नुसार राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार उफअत सुलताना इस्माईल तडवी यांनी भुसावळ जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

फैजपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसुचित जाती महिला राखीव असून या जागेवर भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार महानंदा होलेे (टेकाम) या बेकायदेशिरपणे निवडणूक लढवून विजयी झाल्याचा आरोप रफअत सुलताना यांनी याचिकेत केला आहे. त्यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने ग्राह्य धरुन याची येत्या 3 जानेवारी 2017 रोजी तारीख देण्यात आली आहे. 27 नोव्हेंबर रोजी झालेली नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया व 28 नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या निकालाची वैधता याविरोधात रफअत सुलताना यांच्या वतीने अ‍ॅड. खालिद शेख व अ‍ॅड. जी.ए. शेख यांनी याचिका दाखल केली आहे. या न्यायालयीन लढाईसंदर्भात फैजपूर शहरात तर्कवितर्क लावले जात असून सर्वांचे लक्ष लागले आहे.