फैजपूरला गवंडी कामगार मजुरांचे उपोषण

0

फैजपूर- वाळू ठेका पद्धत बंद करून परमीटची परवानगी द्यावी, शासकीय कामे मजूर वर्गाला द्यावी, रेशनकार्ड उपलब्ध करून मिळावे, अन्य सुरक्षा योजनेमध्ये नाव समाविष्ट करावे आदी मागण्यांसाठी पत्रकार मलिक शाकिर मुसा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली गवंडी कामगारांनी फैजपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून आमरण उपोषण छेडले आहे.

या मागण्यांसाठी उपोषण
गवंडी कामगार मजूर वर्गाची घर, पाणीपट्टी, वीज बिल माफ करावे, नोंदणीकृत मजूर वर्गातील मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी तसेच दुष्काळ घोषित झाला असला तरी मजुरांना कोणताही लाभ अद्यापपर्यंत न मिळाल्याने तो देण्यात यावा, मजूर वर्गासाठी शासनाने मनरेगा योजनेतून कामे द्यावीत, फैजपूर नगरपालिकेत मजूर वर्गाचे दाखले मिळण्यासाठी सक्तीची 200 रुपये आकारणी तत्काळ बंद करावी या मागण्यांसाठी आमरण उपोषण छेडण्यात आले आहे.

यांचा सहभाग, अनेकांचा पाठिंबा
उपोषणात मलिक शाकिर मुसा, शेख इरफान शे.ईस्माईल, शे.कबीर शे.कय्युम, शे.अमीर शे.कय्युम, कलंदर बाबू तडवी, रफिक सिकंदर तडवी, शे करीम शे.रहेमान, शे.इम्रान शे.रहेमान, सद्दाम इब्राहीम तडवी, हमीद अली कासम अली आदी सहभागी झाले आहेत. दरम्यान, आमरण उपोषणाला भाजपा सरचिटणीस संजय सराफ, उपनगराध्यक्ष कलीमखान मणियार, इरफान मेंबर, रशीद तडवी, डॉ.दानिश शेख, भारीप शहराध्यक्ष अमर मेढे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ.गणेश चौधरी, काँग्रेस अध्यक्ष कौसरअली, हाडवैद्य रघुनाथ कुंभार, मलक आबीद, माजी नगरसेवक मनोज कपडे, शकिर शेख आदींनी भेटी देऊन आपला पाठिंबा दिला तर उपोषणकर्त्यांशी आमदार हरीभाऊ जावळे यांनी फोनवरून संवाद साधला.