फैजपूरातील अल्पसंख्यांक वस्तीत पाणीपुरवठा बंद

0

नगरसेविका पतींचे पत्रक ; दमदाटी केली नाही, हे तर आरोपांचे षडयंत्र

फैजपूर- शहरातील नगरसेविका पतींचा शासकीय कामकाजात होणारा हस्तक्षेप व कर्मचार्‍यांना मिळणार्‍या अपमानास्पद वागणुकीनंतर दोन दिवसांपूर्वी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे यांनी तीन नगरसेविका पतींना लेखी पत्र पाठवून त्यांची कानटोचणी केली होती. यानंतर या नगरसेविका पतींनी पत्र प्रसिद्धीस दिले असून शहरातील पठाणवाडी, ईस्लामपुरा, कुरेशी मोहल्ला, तहानगर, मिल्लत नगर सिंधी कॉलनी या भागांमध्ये अल्पसंख्याक वस्ती असून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार केली आहे. या भागातील नागरिक, महिला, लहान मुले व वृद्धांचे हाल होत असून पाण्यासाठी महिला वर्गाची पायपीट होत आहे. रमजान महिना असल्याने रोजेदारांना संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरीांचे हाल होत असल्याने त्यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

आम्ही समाजातील सुशिक्षीत घटक, गैरवर्तन केले नाही
नगरसेविका पती शेख इरफान, रईस मोमीन व मलक आबीद यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आम्ही तिघांनी या भागात फिरून प्रत्येक नागरीकांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. सुज्ञ व जबाबदार नागरीक समजून आपले कर्तव्य समजून या भागाच्या नगरसेविका व नगरसेवक यांच्या सोबत फिरून नागरीकांच्या सर्व समस्या नम्रपणे नगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापतींपुढे मांडल्या तसेच आम्ही कोणत्याही कर्मचार्‍याशी दमदाटी केलेली नाही किंवा त्याला दबावाखाली काम करायला सांगितले नाही. आम्ही सुद्धा समाजातील सुशिक्षित जबाबदार नागरीक असून आम्ही समस्या मुख्याधिकारी व कर्मचारी यांच्याकडे मांडू शकतो.

आमच्याविरुद्ध राजकीय षडयंत्र
काही दिवसांपूर्वी आमच्या विरुद्ध प्रेस नोट देण्याचा प्रकार म्हणजे हे एक राजकीय मोठे षडयंत्र आहे. रमजान महिण्यात पाण्यासाठी काही लोक राजकारण करीत आहेत. मुख्याधिकारी यांच्याकडे खोट्या तक्रारी करणे म्हणजे अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. पाण्यासाठी मागीलप्रमाणे तोडफोडीच्या व कर्मचार्‍यांना मारहाणीच्या घटना झालेल्या आहे परत अशा घटना होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत, असेदेखील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

अखेरच्या घटकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी प्रयत्न उपनगराध्यक्ष
उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरीक पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे. यामुके काही भागात उन्हाळा असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाहीय. शेवटच्या टोकापर्यंत सर्वांना घराघरात पाणी पोहचावे यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू असल्याचे उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती कलिम मणियार म्हणाले.