25 लाखांचे प्रकरण : पुण्यातून आवळल्या मुसक्या
फैजपूर- शहरातील आशीर्वाद अॅक्सीडेंट हॉस्पीटलचे डॉ.शैलेंद प्रभाकर खाचणे यांना 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी श्याम पुनाजी इंगळे (शिव कॉलनी, फैजपूर), शांताराम मांगो तायडे (हिंगोणा) व शेख युनूस शेख अयुब उर्फ गबल्या (फैजपूर) यांच्याविरुद्ध फैजपूर पोलिसात शनिवार, 11 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते तर आरोपी पुण्यातील देहू रोड परीसरातील एका प्लॅटमध्ये असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाल्यानंतर एक पथक आरोपी शांताराम मांगो तायडे (हिंगोणा) व शेख युनूस शेख अयुब उर्फ गबल्या (फैजपूर) यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
शेत जमिनीचा ताबा सोडण्यासाठी मागितली खंडणी
डॉ.खाचणे यांनी भुसावळ रोडवरील शेत गट क्रमांक 945 ही जमीन खरेदी केली असून संशयीतांनी डॉक्टरांच्या रुग्णालयात तसेच शेतात 12 जुलै ते 5 ऑगस्ट 2018 दरम्यान अनधिकृतपणे प्रवेश करीत शेत गट क्रमांक 945 हे रवींद्र जावळे यांनी घेतले असून तुम्ही त्या जमिनीचा ताबा सोडा अन्यथा त्या जागेवर आम्ही पक्षाचे बॅनर लावू, अशी धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी 25 लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणातील साक्षीदारांनीही आरोपींनी धमकावले होते. तपास उपनिरीक्षक जिजाबराव पाटील करीत आहेत.