फैजपूरातील मधुकर साखर कारखाना विक्रीला स्थगिती

Relief for manufacturers and workers: Sale of Madhukar sugar factory in Faizpur suspended फैजपूर : हजारो कामगारांसह ऊस उत्पादकांसाठी आशेचा किरण असलेल्या मधुकर साखर कारखान्याच्या विक्रीला अखेर कर्मचार्‍यांच्या आक्रमक भूमिकेनंतर स्थगिती मिळाली आहे. आमदार राजूमामा भोळे यांनी नागपूर विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सहकार मंत्र्यांनी या कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कर्मचार्‍यांचा रास्ता रोको
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली असून खाजगी मालकाने गाळप हंगाम सुरू केला आहे. नवीन मालकांनी कर्मचार्‍यांची थकीत देणी देण्यास नकार केल्याने कर्मचार्‍यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे तर बुधवारी सकाळपासून आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

गुलाबराव देवकर यांचे वाहन अडवले
बुधवारी सकाळी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास साखर कारखान्याला भेट दिली. याप्रसंगी गेटवरच कर्मचार्‍यांनी त्यांची गाडी अडवून आपला रोष व्यक्त केला तर काहीही झाले तरी आंदोलन मागे न घेण्याचा इशारादेखील याप्रसंगी कामगारांनी दिला. आजच्या आंदोलनात कर्मचार्‍यांनी अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतली.

केवळ 15 कोटींमध्ये कारखान्याची विक्री कशी
हे सर्व होत असतांना बुधवारी जळगावचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करून मधुकर साखर कारखान्याच्या निविदा प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित केला. शेतकरी आणि कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणात देणी बाकी असतांना फक्त 15 कोटी रूपये घेऊन खासगी मालकाच्या ताब्यात हा कारखाना कसा दिला ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर सहकार मंत्र्यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.