फैजपूरातील मसाकाचा गाळप हंगाम यंदा बंद ठेवण्याचा निर्णय

0

ऊस लागवडीसाठी ऊस उत्पादकाना संचालक मंडळाचे आवाहन

फैजपूर : मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या 42 वर्षापासून अखंडपणे गाळप करीत आहे मात्र सध्या कारखान्याची आर्थिक परीस्थिती अत्यंत बिकट असल्याने तसेच मागील वर्षी पाण्याची कमतरता होती त्यामुळे ऊस लागवड कमी झाल्याने गाळपासाठी अत्यंत कमी ऊस उपलब्ध असल्याने व मागील वर्षाचे ऊस पेमेंट, ऊस तोडणी वाहतूक पेमेंट, कामगार पगार, पीएफ या व अशा इतर अनेक देणी थकीत झाल्याने गाळप हंगाम 2019-20 संचालक मंडळाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे नोंदणी केलेला संपूर्ण ऊस जवळच्या मुक्ताई शुगर एनर्जी, मुक्ताईनगर यांना आपल्या कारखान्याच्या सहकार्याने व मुक्ताई शुगर एनर्जी, मुक्ताईनगर यांच्या तोडणी वाहतूक यंत्रणेने गाळपास पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऊस लागवडीसाठी संचालक मंडळाचे आवाहन
मध्यंतरीच्या काळात कारखान्याच्या परीस्थितीमुळे ऊस उत्पादकांमध्ये नवीन ऊस लागवड करण्याबाबत संभ्रमता निर्माण झाल्याने ऊस लागवड अल्पप्रमाणात झाली आहे. गाळप हंगाम 2020-21 कारखाना स्तरावर किंवा इतर अन्य प्रकारे सुरू करावयाचा झाल्यास ऊस लागवड होणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे संचालक मंडळ सभेने लागवड हंगाम 2019-20 साठी आतापर्यंत झालेल्या ऊसाची व नवीन ऊस लागवड करणे व नोंदणी करण्यासाठी चेअरमन शरद महाजन व सर्व संचालक मंडळाने ऊस उत्पादकांना आवाहन केले आहे. सध्या आडसाली ऊस लागवडीचा कालावधी संपला असल्याने 265 या ऊसास कालावधी कमी पडेल व परीपकवता होणार नाही यामुळे टनेज सुद्धा कमी येईल त्यामुळे 265 या जाती पेक्षा नवीन 8005 आणि 10001 या नवीन जातींची ऊस लागवड करण्यावर भर द्यावा, असेही आवाहन चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे, अरुण पाटील, नितीन चौधरी, कार्यकारी संचालक एस.आर.पिसाळ यांनी केले आहे.