जातीचा दाखला देण्यासाठी स्वीकारली दिड लाखांची लाच
फैजपूर- जातीचा दाखला देण्यासाठी दिड लाखांची लाच घेणार्या फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयातील लाचखोर नायब तहसीलदार प्रकाश चिंधू धनगर (रा.रावेर) यांना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील तक्रारदाराला तीन मुले असून त्यांना जातीचा दाखला देण्यासाठी धनगर यांनी प्रत्येकी 60 हजारांप्रमाणे लाचेची मागणी केली होती तर प्रकरणाचा दिड लाखात तंटा मोडण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. गुरुवारी सायंकाळी जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक निलेश लोधी व सहकार्यांनी सापळा यशस्वी केला. या कारवाईने फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कृत्यात कोण-कोण सहभागी होते? शिवाय दिड लाखांची लाच एकटा धनगर घेणार होता की आणखी कोणाचा त्यात हिस्सावाटा होता? याबाबतही एसीबी खोलवर चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, धनगर यांच्या रावेर शहरातील घराची झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती तर दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे चोरीदेखील झाल्याची माहिती आहे.