फैजपूरातील लाचखोर नायब तहसीलदाराला तीन दिवसांची पोलिस कोठडी

0

फैजपूर- जातीचा दाखला देण्यासाठी दिड लाखांची लाच घेणार्‍या फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयातील लाचखोर नायब तहसीलदार प्रकाश चिंधू धनगर (रा.रावेर) यांना गुरुवारी सायंकाळी जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली होती. आरोपीला शुक्रवारी दुपारी भुसावळ येथील अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी आरोपीची अधिक चौकशी करण्यासाठी व या गुन्ह्यात अन्य कुणाचा सहभाग आहे याबाबत तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केल्यानंतर न्या.एस.पी.डोरले यांनी तीन दिवसांची म्हणजे 8 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

संघर्ष यात्रेत सहभाग नोंदवून आरोपीस केली होती अटक
आरोपी धनगर याच्या मुसक्या आवळण्यासाठी एसीबीचे पथक गुरुवारी सकाळपासून फैजपूरात दाखल झाले होते तर सापळा लीक न होण्यासाठी पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी संघर्ष यात्रेत सहभाग नोंदवत झेंडेही धरले तसेच वाहनाला झेंडाही लावण्यात पथकाची ओळख पटली नाही त्यामुळे आरोपीच्या सहज मुसक्या आवळता आल्या. यावल तालुक्यातील तक्रारदाराच्या तीन मुलांना जातीचा दाखला देण्यासाठी धनगर यांनी प्रत्येकी 60 हजारांप्रमाणे लाचेची मागणी केल्यानंतर दिड लाख देण्याचे ठरल्यानंतर सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. शुक्रवारी आरोपीला भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी युक्तीवाद केला तर पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनीही स्वतः बाजू मांडली.