फैजपूर : जळगावच्या मेहरूण परीसरातील एका नागरीकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शहरातील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान फैजपूर शहरातील काही भागातील रस्ते नागरिकांनी पूर्णपणे बंद करून अनोळखी व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही, असे सूचनाफलक लावले आहेत.
फैजपूरातील अनेक भागात अनोळखींना नाकारले प्रवेश
गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे मात्र तरी काही नागरीक विनाकारणाने घराच्या बाहेर पडून आम्हाला काही होत नाही या आर्विभावात आहेत. जळगाव शहरात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडताच शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आपल्या परीसरात अनोळखी व्यक्ती येऊ नये याची दक्षता रहिवाशांनी घेतली आहे. आपल्या भागात येणारे रस्ते काही ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे. दक्षिण बाहेर पेठ, सिंधी कॉलनी, सुतार वाडा या भागातील रस्ते नागरीकांनी पूर्ण बंद करून अनोळखी व्यक्तीला आत प्रवेश मिळणार नाही, असे सूचना फलक लावले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवांचे स्टीकर लावून दुचाकीवर विनाकारण काही नागरीक शहरात फिरतांना दिसत आहे. दुचाकीवर लावण्यात आलेले अत्यावश्यक स्टीकरची पूर्णपणे खात्री करावी व दोषी दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरीक करीत आहेत.