फैजपूरात अवैध रीक्षा चालकांची मुजोरी ; पोलिसालाच केली मारहाण

2

रीक्षा बाजूला घेण्याचे सांगितल्याने वाद ; रीक्षा चालकाने स्वतःच्या हातावर कटर मारून केली दुखापत

फैजपूर- फैजपूर येथील बस स्थानकाबाहेर एका रीक्षा चालकाला पोलिसांनी प्रवाशी रिक्षा बाजूला लावण्याचे सांगितल्याने त्या रीक्षा चालकाने पोलिसावर हल्ला करीत त्यांना मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली. पोलिसाला मारहाण केल्यानंतर उलट पक्षी रीक्षा चालकाने स्वतःच्या हातावर कटरने वार करत जखमी करून घेतल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली. खाकीवरच हल्ला होत असतांना सर्व सामान्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र महाजन यांच्यावर हल्ला करणारा आरोपी रीक्षा चालक शाहरुख शेख करीम यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध प्रवासी वाहतूकदारांवर कारवाई करताना पोलिसावर हल्ला
फैजपूर बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या अ‍ॅपे रीक्षा उभ्या असताच शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अ‍ॅपे रीक्षा चालक शाहरुख शेख करीम याला पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सुधाकर महाजन व पोलीस कॉन्स्टेबल उमेश सानप यांनी रीक्षा बाजूला लावण्याचे सांगितले असता त्याचा राग आल्याने रीक्षा चालक शाहरुख याने रीक्षाच्या सीटवर बसून रीक्षाच्या समोरील काचला लाथ मारून ती फोडली त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र महाजन यास हातातील फायटरने महाजन याच्यावर हल्ला चढविला त्यामुळे महाजन याच्या उजव्या बर्गडीला गंभीर दुखापत झाली. यावेळी बस स्थानकाबाहेर मोठा जमाव जमा झाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच फौजदार जिजाबराव पाटील व सहकार्‍यांनी घटनाथळी धाव घेऊन तत्काळ जमाव पांगविला. यावेळी पोलिसांनी शाहरुख याला शासकीय कामात तुने अरथळा आणला म्हणून कारवाई करू, असे सांगितले असता रीक्षा चालक शाहरुख याने स्वतःच्या उजव्या हातावर धारधार कटरने वार करून जखमी करून घेतले व सेवा बजावत असलेल्या पोलिसांना मी तुमच्या विरुद्ध खोटी तक्रार करून पोलीस खात्यातून निलंबित करायला लावेल, अशी धमकी दिली. या घटने प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सुधाकर महाजन याने तक्रार दिल्यावरून शाहरुख याच्याविरुद्ध प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनेचा तपास सपोनि दत्तात्रय निकम व जिजाबराव पाटील करीत आहे.

गुन्हेगारांवर हद्दपारीसह मोक्काची कारवाई होणार
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनेची माहिती घेतली तर डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांनी शहरातील गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांची कुंडली जमा करणे सुरू झाले असून त्यांच्यावर हद्दपारी व मोक्कासारखी कारवाई करण्याचे प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठवले जातील, असे सांगितले.

सोशल मीडियावर घटनेचा निषेध व कारवाईची मागणी
फैजपूर पोलिस ठाण्याने तयार केलेल्या पीएस 100 या ग्रुपवर ग्रुपमधील अनेक सदस्यांनी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.