फैजपूर : सेफ झोनमध्ये असलेल्या फैजपूरात गुरुवारी सायंकाळी एका महिलेचा कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली. सिंधी कॉलनी भागात रहिवासाला असलेल्या महिला रुग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर प्रशासनाने खबरदारी घेत हा परीसर सील केला असून नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बाधीत रुग्ण काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथून आल्याचे समजते.
नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन
फैजपूर शहरात आजवर शहरात एकही कोरोनाबाधीत होऊ नये यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले होते. विशेष करून प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले हे आपल्या सहकार्यांसह जनतेने लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन करीत होते शिवाय नगरपालिका प्रशासन तसेच पोलिस, आरोग्य विभागाच्या विविध खात्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आजवर फैजपुरात कोरोनाचा शिरकाव नव्हता. तथापि, आज एक बाधीत रुग्ण आढळून आल्याने शहरवासयांनी सतर्क राहण्याची गरज आहे. दरम्यान, फैजपूर शहरवासीयांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.