फैजपूरात गॅस कटरने एटीएम फोडले मात्र 45 लाखांची रोकड सुरक्षीत

भल्या पहाटेच्या घटनेने खळबळ : सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर मारला स्प्रे

फैजपूर : शहरातील दूध शीतकरण केंद्रासमोरील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने चोरट्यांनी त्यात यश न आल्याने सुमारे 45 लाखांची रोकड सुरक्षीत राहिली. शनिवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्हीत आपली छबी कैद न होण्यासाठी कॅमेर्‍यांवर स्प्रे मारल्याने चोरटे नेमके किती असावेत? याचा अंदाज येवू शकलेला नाही.

पोलीस दलाची धाव
शहरातील यावल रस्त्यावर दूध शीतकरण केंद्रासमोरील स्टेट बँकेचे एटीएम मशीन असून शुक्रवारीच या एटीएममध्ये लाखोंच्या रोकडचा भरणा करण्यात आला होता. अर्थात शनिवार व रविवारी नागरीकांची गैरसोय होवू नये या उद्देशाने रोकड टाकण्यात आल्याचा अंदाज गृहीत धरून माहितगार चोरट्यांनी एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शनिवारी पहाटे या एटीएममधून धूर निघत असल्याचे काही जणांना दिसताच त्यांनी स्टेट बँकेतील कर्मचार्‍यांना कळवले तसेच पोलीस व अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.

अपर पोलीस अधीक्षकांची धाव
गॅस कटरचा वापर करूनही चोरट्यांना एटीएम मशीन फोडता न आल्याने व आग लागल्याने अथवा कुणीतरी आल्याची बहुतेक चाहूल लागल्याने चोरट्यांनी अर्ध्यातच पळ काढल्याचा संशय आहे. शनिवारी पहाटे हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांना माहिती कळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर स्थानकाचे सहा.निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या संदर्भात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.