फैजपूरात पांडुरंगाचा जयघोष करीत रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात

0

170 वर्षांची अखंड परंपरा ; रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांची उसळली गर्दी

फैजपूर- सुमारे 170 वर्षाची अखंड परंपरा लाभलेल्या संतश्री खुशाल महाराज देवस्थानचा पांडुरंग रथोत्सवाला शुक्रवारी दुपारी श्री पांडुरंगाच्या जयघोषात सुरूवात झाली. हजारो भाविकांच्या उपस्थितीने फैजपूर शहरात भक्तीचा मळा फुलला होता. 1848 साली श्री हरी महाराज यांनी निर्माण केलेल्या रथातून स्वयंभू विठ्ठलाच्या मूर्तीची मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली तसेच रथावर आरूढ होऊन भक्तांच्या भेटीला येणार्‍या पांडुरंगाची मूर्ती ही स्वयंभू व साक्षात असल्याने फैजपूर शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.

विधीवत पूजेनंतर रथोत्सवाला सुरुवात
शुक्रवारी दुपारी खुशाल महाराज देवस्थानात देवस्थानचे गादीपती पुंडलिक महाराज व प्रवीण महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. स्वयंभू पांडुरंगाच्या मूर्तीला फुलांनी सजवलेल्या व रोषणाई केलेल्या रथावरती आरूढ केल्यानंतर माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांच्या हस्ते पांडुरंगाची व रथाची विधिवत पूजा झाली. आमदार हरीभाऊ जावळे यांची प्रसंगी उपस्थिती होती. भाविकांच्या प्रचंड उत्साहात दुपारी साडेचार वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रस्थानी परीसरातील भजनी मंडळ व हरे रामा हरे कृष्णाचे पथक होते. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. सुभाष चौकात कला शिक्षक राजू साळी, ललित कोष्टी, निलेश निंबाळे, बादल रल व विक्की जयस्वाल यांच्या प्रयत्नातून स्वागतासाठी महाकाय रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीने लक्ष वेधले. रथोत्सवाची मिरवणूक रथगल्ली, लक्कड पेठ, कासार गल्ली, सुभाष चौक, ब्राह्मण गल्ली मार्गाने निघून रात्री दहा वाजता पुन्हा रथ गल्लीत थांबली.

यांचा रथोत्सवात सहभाग
रथोत्सवाच्या महा पूजेदरम्यान मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विलास चौधरी, अनिल नारखेडे, पप्पू चौधरी, माजी होमगार्ड समादेशक पंडित कोल्हे यासह जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातून आलेले भावसार समाजाचे प्रतिनिधी भावसार समाज अध्यक्ष अरुण भावसार, अशोक भावसार, शैलेश पांडे, अनिल देविदास भावसार, रवींद्र श्रावण भावसार, राजू पेंटर, सुनील आधार, अनिल भावसार, देविदास भावसार, किरण भावसार, किशोर भावसार, उमेश भावसार, सतीश भावसार, श्री हिंगलाज माता प्रतिष्ठान अध्यक्ष शरदचंद्र बंडोपंत चव्हाण, प्रीतेश अशोक भावसार, जळगाव महिला मंडळ अध्यक्ष नंदा सुनील भावसार, संयुक्त खानदेश भावसार समाज अध्यक्ष ओमकार भावसार, पिंप्राळा समाजात अध्यक्ष पंडित उत्तम भावसार, अमळनेर समाजाध्यक्ष सुरेश भावसार भुसावळ अध्यक्ष श्रीराम देवताळू सेक्रेटरी दिलीप वाघमारे, प्रभाकर पांडुरंग भावसार, हरीश गणपत भावसार, अमळनेर अध्यक्ष सुरेश भावसार परेश भावसार आणि कार्यकारणी, धुळे भावसार समाज अध्यक्ष मनोज कांतीलाल भावसार सेक्रेटरी मनोज भावसार आणि कार्यकारणी, विदर्भ युवा अध्यक्ष महेश भाऊ जोगी यांची उपस्थिती होती. दिनेश जोशी, समाधान जोशी, नंदू जोशी, नरेंद्र बहादरपूरकर, हिमांशू जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले. रथ उत्सवादरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, फौजदार जिजाबराव पाटील, आधार निकुंभे व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला. वीज कंपनीचे अधिकारी धनंजय चौधरी व त्यांच्या सहकार्‍यांनी रथ मार्गावर अडथळा न येण्यासाठी सहकार्य केले.