फैजपूर- केळीचे खोड खाल्ल्याने बाधा होऊन चार दिवसांपूर्वी 15 गुरे दगावल्याची घटना ताजी असतांनाच गुरुवारी पुन्हा केळी खोड खाल्ल्याने चार गुरे दगावली. वारंवार होणार्या या गुरांच्या या मृत्यूमुळे पशूधन मालक चिंतेत सापडले आहेत. शहरातील खळवाडी भागातील रमेश किसन गलवाडे यांचा गुरांचा गोठा आहे तेथील गुरांना चारा म्हणून केळी खोड खायला दिले असता चार गुरांच्या तोंडाला फेस येऊन खाली कोसळली व क्षणात त्यांचा मृत्यू झाला. विष बाधा झाल्याने या गुरांचा मृत्यू झाल्याचा संशय पशूधन मालकांनी व्यक्त केला. गुरांचा मृत्यू झाल्याची माहिती तलाठी शेख व संबधीत विभागाला देण्यात आली आहे. चार दिवसापूर्वी 15 गुरे दगावली होती. गुरांचा पाचनामा केला असता त्यात पशुधन मालकांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले होते. या घटनेने पशुधन मालक घाबरले असून गुरांना चारा म्हणून द्यायचे तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच शेतकरी हा अडचणीत सापडला असताना त्यात गुरांच्या मृत्यू मुळे अजून अडचणीत वाढ झाली आहे.