फैजपूर। येथील गेल्या दोन आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घरफोडी करुन चोर्यांचे सत्र सुरुच असून या वाढत्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून 27 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करुन लाखोंचा मुद्देमाल चोरुन नेला. तर वकिलाच्या घरात प्रवेश करुन त्यांना चाकूचा धाक दाखविला.
चाकुचा धाक दाखवून केली चोरी
येथील मिल्लतनगरात 27 जुलैच्या मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. याठिकाणी वास्तव्यास असलेले वकिल जाबीर यांना त्यांनी चाकू अंगास लावला तर त्यांची पत्नी व मुलगी भयभित झाले. त्यानंतर चोरट्यांनी शे. हैदर शे. गुलाब यांच्या घरातील रोख 70 हजार तर अकिल खान बशारत खान यांच्या घरातील 7 ते 8 हजार रुपये लुटले. मिल्लतनगर भागात घटनास्थळी एपीआय दत्तात्रय निकम यांनी भेट दिली.
फैजपूर शहरात गेल्या दोन आठवड्यापासून 15 ते 20 ठिकाणी घरफोडी होवून चोरीच्या घटना झाल्या आहेत. मात्र पोलीसांना कोणताही सुगावा लागला नाही. आतापर्यंत शिवकॉलनी, लक्ष्मीनगर, यावलरोड, विद्यानगर, आराधना कॉलनी, मिल्लतनगर अशा विविध भागात 15 ते 20 ठिकाणी घरफोड्या झालेल्या आहेत. आणि हे सत्र चालूच आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पोलीस अशा घटना रोखण्यास असमर्थ असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीसांना याबाबत माहिती विचारली असता गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.